डोंबिवली जवळील दावडी गावात मंगळवारी एका महिलेची तिच्या राहत्या घरातच हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ठेवला असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केला असता कुटुंबाच्या ओळखीतील २५ वर्षीय तरुणानेच सुप्रिया शिंदे यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
किशोर शिंदे, त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगा हे कुटुंब दावडी येथील ओम रेसिडेन्सी संकुलात राहतात. सोमवारी सकाळी किशोर शिंदे हे कामावर गेले. दुपारच्या वेळेत मुलगा शाळेत गेला. त्यानंतर सुप्रिया घरात एकट्याच होत्या. किशोर यांचा मित्र विशाल भाऊ घावट हा नेहमी वाचनासाठी पुस्तके घेऊन शिंदे कुटुंबीयांच्या घरी येत होता. वाचलेली पुस्तके तो घेऊन जायचा आणि नवीन पुस्तके पुन्हा आणून द्यायचा. त्यांची कौटुंबिक ओळख होती.
डोंबिवलीत महिलेची गळा दाबून हत्या, सोफ्यात लपवून ठेवला होता मृतदेह; पोलीसही चक्रावले
सोमवारी सकाळी किशोर सुप्रिया शिंदे यांच्या घरी पुस्तके बदलण्याचे निमित्त करून आला. त्याने मुलगा शाळेत केव्हा जातो अशी विचारणा केली. मुलगा साडेबारा वाजता शाळेत जातो असे सुप्रिया शिंदे यांनी विशालला सांगितले. सोमवारी सकाळी मुलगा घरी असल्यामुळे विशालला काही करता आले नाही. त्यानंतर विशाल मंगळवारी दुपारी दीड वाजता सुप्रिया शिंदे यांच्या घरी पुस्तके बदलण्याची निमित्त करून आला. घरात कोणीच नाही हे पाहून विशालने सुप्रिया यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रिया यांनी त्याला विरोध करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया यांनी दरवाजाजवळ ओरडा केला पण तो आवाज बाहेर आला नाही.
विशालने तितक्यात सुप्रिया यांना घरात ओढून त्यांचे डोके फरशीवर आपटले. नंतर पाडून जवळील टायच्या सुप्रिया यांची गळा दाबून हत्या केली. दिवसा मृतदेह कुठे नेणार असा प्रश्न निर्माण झाल्याने विशालने सुप्रिया यांच्या घरातीलच सोफ्यात त्यांचा मृतदेह ठेवला आणि पोबारा केला.
नेमकं काय झालं होतं –
किशोर शिंदे सकाळी कामावर गेले सायंकाळी घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती. त्यांनी तिचा शोध घेत नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सुमारास किशोर पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. याच दरम्यान घरी असलेल्या नातेवाईकांना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफासेटमध्ये आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
चपलेवरुन पोलिसांनी लावला शोध –
मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला होता, मात्र आरोपीचा सुगावा लागत नव्हता. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. दरम्यान तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचं पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कोणाच्या होत्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत नेमकी कोणती चप्पल होती हे निष्पन्न केलं आणि आरोपी विशाल घावटपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले तेव्हा विशाल हादेखील त्यांच्यासोबत होता. काहीही सुगावा नसताना फक्त चपलेच्या आधआरे आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. दरम्यान या इमारतीतील व आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचं आवाहन केलं आहे.