* कोकण, साताऱ्यापर्यंत पोहोचला
* पुढचा प्रवास तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर
नैर्ऋत्य मान्सून १ जूनला केरळला पोहोचल्यानंतर तीनच दिवसांत म्हणजे मंगळवारी दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला. त्याने हर्णे आणि साताऱ्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे तो महाराष्ट्रात आणखी पुढे सरकण्यासाठी किमान तीन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, पुणे शहर व परिसरात मंगळवारी वादळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेखाली असताना मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची सुवार्ता आहे. त्याने तीनच दिवसांत केरळपासून महाराष्ट्रापर्यंतचा पल्ला गाठला. सोमवारी रात्री गोवा ओलांडून तो महाराष्ट्रात दाखल झाला. त्याने कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे बरेचसे अंतर कापले. तिथे तो हर्णेपर्यंत पोहोचला. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली जिल्हे व्यापून तो साताऱ्यात दाखल झाला. त्यामुळे सोमवार रात्रीपर्यंत या परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यानंतर मंगळवारी त्याचा जोर कमी झाला. पुणे व परिसरात मात्र वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारच्या दोनच तासांत पुणे वेधशाळेत तब्बल ४२.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर जालना, औरंगाबाद येथेही पावसाच्या सरी बरसल्या. कोकणातही काही ठिकाणी पाऊस झाला.
मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला असला तरी आता तो विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रातील हवामानाच्या घडामोडी तसेच, पश्चिम किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे हे घडणार आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतर पुन्हा मान्सून आणखी पुढे सरकेल. दरम्यानच्या काळात ढगांच्या गडगडाटात वादळी पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती भारतीय हवामनशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी दिली. दक्षिण महाराष्ट्राबरोबरच मान्सून मध्य अरबी समुद्र, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, तेलंगणा या भागातही पुढे सरकला.