नोंदणी, दुरुस्तीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय

वसई, विरार शहरात अनेक ठिकाणची आधार केंद्रे बंद झाली आहेत. सरकारने बँकिंग व्यवहारापासून ते प्रत्येक शासकीय कामासाठी आधारकार्ड हे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली आहे. मात्र वसईतील आधारकार्ड केंद्रे बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.

काही नागरिकांच्या आधारकार्डमध्ये चुका असल्याने व नव्याने आधारकार्ड काढण्यासाठी नागरिक आधार केंद्रावर जात असतात परंतु शहरातील बहुतेक जुनी आधारकार्ड केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रात फेऱ्या माराव्या लागत आहे.

शहराचे वाढते नागरीकरण यामुळे शहरात नव्याने आधार केंद्राची निर्मिती होणे गरजेचे आहे. शहरात नवीन आधारकार्ड केंद्रे  सुरू करण्यात यावी यासाठी मनसेचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी पालघर येथील आधारकार्ड प्रकल्प विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.

वसईत सध्या ७ आधारकार्ड केंद्र ही महासेवा केंद्रात तर बँक व पोस्ट ऑफिस मिळून १५ केंद्र अशी एकूण २२ केंद्र सुरू आहेत. वसईतील वसई कोर्ट, देवतलाव, वालीव, नालासोपारा पूर्व, पश्चिम, विरार या ठिकाणी ही केंद्र सुरू असल्याची माहिती पालघर आधारकार्ड प्रकल्प व्यवस्थापक विभागाने दिली आहे.

दररोज आधारकार्ड केंद्रावर मोठय़ा प्रमाणात नागरिक हे नवीन आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी जात असतात. मात्र केंद्रावर गर्दी असल्याने नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. कधी कधी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापर्यंत आधार काढण्यासाठी वाट बघावी लागत आहे.

त्यामुळे नागरिकांचा वेळदेखील वाया जात आहे. तर कधी केंद्रावर इंटरनेट सेवा बंद असेल तर माघारी परतावे लागते. यासाठी वसईत जुनी बंद करण्यात आलेली केंद्र व नवीन केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

वसई तालुक्यात नव्याने ४० आधार केंद्र सुरु करण्यात येणार आहेत त्यातील काही केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्या त्या विभागाच्या चालकाची माहिती ‘यूआयडी’ विभागाकडे कार्यान्वित होण्यासाठी पाठवली आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच नवीन आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात येतील.

– ऊर्जित बर्वे, आधारकार्ड प्रकल्प व्यवस्थापक, पालघर

Story img Loader