अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा
अमरावती : लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजपला कौल देऊन काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनतेच्या भावना आता काँग्रेसच्या नेत्यांना समजल्या आहेत. त्यामुळे अनेक काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातील चांगल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असा दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. औषधाप्रमाणे काँग्रेसची ‘एक्सपायरी डेट’ संपली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते. बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले, ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेना युतीला भरघोस यश दिले, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील राज्यात युतीला दमदार यश मिळणार आहे, यात कुणाचेही दुमत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीची जी स्थिती १७ राज्यांमध्ये झाली आहे, ती स्थिती बघता काँग्रेस पक्ष हा उभा होऊच शकत नाही, असे चित्र आहे.
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी हटवण्याची मागणी केल्याचे ऐकून आपल्याला आनंद झाला, असा उपरोधिक टोला देखील त्यांनी धानोरकर यांना लागवला. आधी नवनियुक्त खासदारांनी जिल्हा काँग्रेसच्या सदस्यत्वाची पुस्तिका वाचावी, असा सल्ला देखील मुनगंटीवार यांनी दिला.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी जे निर्णय घेतले, त्यावर जनतेने विश्वास प्रकट केला आहे. राज्य सरकारने देखील लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील सहजपणे जिंकू, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.