मध्य भारतात दबदबा राखून असलेल्या सशस्त्र नक्षल चळवळीला सध्या नैराश्यवादाने घेरल्याने चळवळीला खिंडार पडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. अनेक ज्येष्ठ सदस्य चळवळ सोडण्याची भाषा करू लागल्याने आता नक्षलवादी नेत्यांनी स्वत:च तयार केलेल्या नियमांना बगल देत अशा सदस्यांना शिक्षा देणे व प्रसंगी ठार मारण्याचे सत्र सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेजारच्या आंध्र प्रदेशात व गडचिरोली जिल्हय़ात चळवळीचे नेतृत्व करणारा जहाल नक्षलवादी शेखरण्णा नुकताच आंध्र पोलिसांपुढे शरण आला आहे. त्याच्या चौकशीतून समोर येणारी माहिती या चळवळीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारी आहे. गेल्या ३० वर्षांपासून सक्रिय असलेल्या या चळवळीतील अनेक ज्येष्ठ नक्षलवादी आता वृद्धत्वाकडे झुकले आहेत. यातून निर्माण झालेल्या आरोग्याच्या तक्रारींनी या सदस्यांना सध्या नैराश्याने ग्रासले आहे. हे सदस्य आता चळवळ सोडून जाण्याची भाषा करू लागल्याने नक्षलवाद्यांचे नेते हादरले आहेत. ही चळवळ भाकप माओवादी या पक्षाकडून संचालित केली जाते. या पक्षाने तयार केलेल्या घटनेनुसार एखाद्या सदस्याला कोणत्याही कारणासाठी पक्ष अथवा सशस्त्र चळवळ सोडून जाण्याची मुभा आहे. यासाठी रीतसर वरिष्ठांची परवानगी घेण्याची तरतूदसुद्धा पक्षाच्या घटनेत आहे. अशा सदस्याला निर्णयापासून रोखू नये, असेही या घटनेत नमूद आहे. आता नैराश्य आलेले सदस्य घटनेतील याच तरतुदीचा आधार घेत बाहेर पडण्याची परवानगी मागू लागल्याने नक्षलवादी नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
नुकत्याच शरण आलेल्या शेखरनेसुद्धा अशी परवानगी मागितली होती. त्याला ती नाकारण्यात आली. त्यामुळेच त्याने पळून जाऊन शरणागतीचा मार्ग स्वीकारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तर गडचिरोली विभागात तब्बल वीस वर्षांपासून सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी दिवाकरचेही वरिष्ठांसोबत मतभेद झाले होते. त्यानंतर त्याने चळवळ सोडण्याची परवानगी मागत आत्मसमर्पणासाठी मध्यस्थ शोधण्याचे काम सुरू केले. हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात येताच त्यांनी दिवाकरला ठार करण्याचा आदेश दिला. यानंतर आजवर त्याच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांनीच त्याची गोळी घालून हत्या केली. या प्रकारामुळे चळवळ सोडून जाण्याच्या मानसिकतेत असलेले अनेक जण हादरले. दिवाकरच्या हत्येनंतर नक्षलवादी नेत्यांनी नैराश्य आलेल्या सदस्यांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवली. यातून सुमारे १० टक्के ज्येष्ठ सदस्य सोडून जाण्याच्या विचारात असल्याचे आढळून आले. या सर्वाची हत्या करणे शक्य नसल्याने या सदस्यांना आता वेगवेगळय़ा पद्धतीने त्रास देणे सुरू झाले आहे. यापैकी काही सदस्यांना ते काम करीत असलेल्या पदावरून हटवण्यात आले. त्यांना पदावनत करीत इतर ठिकाणी पाठवण्यात आले. महत्त्वाच्या मोहिमांमधून त्यांचा सहभाग वगळण्यात आला. त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवले जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. या प्रकारामुळे चळवळ सोडून जाण्याची इच्छा असूनसुद्धा अनेक सदस्यांना सध्या शांत बसावे लागत असल्याची माहिती शेखरने तपास अधिकाऱ्यांना दिली आहे.
आत्मसमर्पणाची भाषा बोलणाऱ्या सदस्यांना मुद्दाम दुर्गम कार्यक्षेत्रात पाठवणे, त्याची व त्याच्या कुटुंबाची भेट न होऊ देणे, त्याच्या मूळ गावापासून त्याला दूर ठेवणे असे प्रकारसुद्धा नक्षलवादी नेत्यांनी आता सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. हे उपाय योजूनसुद्धा एखादा सदस्य सोडून जाण्याच्या मुद्दय़ावर ठाम असेल तर त्याला ठार मारण्याचे आदेशही विभागीय समित्यांना देण्यात आले आहेत. असले प्रकार करून नक्षलवादी नेते स्वत:च तयार केलेल्या घटनेचे उल्लंघन करीत असल्याचे शेखरचे म्हणणे आहे. या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांना विचारणा केली असता त्यांनी या चळवळीतील अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे हे कबूल केले. पोलीस व सुरक्षा दलांचा दबाव वाढत असल्याने सध्या नक्षलवाद्यांना गावात येणेही कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांची रसद बंद झाली आहे. यातूनच हा निराशावाद समोर आला असावा, असे ते म्हणाले.  

Story img Loader