महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लोकसभा २०२४ ची निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रातून २२ जागा लढवण्याचा निर्धार या पक्षाने केला असल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली असून राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. याबाबत आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसेवर टीका केली. सातत्याने भूमिका बदलणाऱ्या नेत्यांनी शहापणाने वागावं अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
राज ठाकरे आज २२ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचं पत्रकारांनी सांगताच, राऊत म्हणाले, भाजपाला मदत होणं गरजेचं आहे. एएआएमआयएम, इतर अन्य पक्ष, काही आघाड्यांचा गेल्या १० वर्षांत हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. हुकूमशाहीविरोधात बोलायचं, केंद्र सरकारला शिव्या घालायच्या आणि काही करण्याची किंवा लढण्याची वेळ आली की वेगळी भूमिका घ्यायची. आपल्या राज्यात अनेक संघटना आणि पक्ष अशाप्रकारच्या भूमिका घेतात.
मतभेद विसरून एकत्र यावं
“देश आणि लोकशाही वाचवण्याची ही वेळ आहे. अशावेळेला सर्व मतभेद विसरून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचं रक्षण करावं या मताचे आम्ही आहोत. भाजपाची सरकारे ही फोडा, झोडा आणि राज्य करा या पद्धतीची आहेत. निदान महाराष्ट्रातील नेत्यांनी तरी शहाणपणाने वागावं अशी आमची भूमिका आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “फडणवीसांना दोन ज्युनिअरच्या हाताखाली…”, संजय राऊतांची खोचक टीका
“हुकूमशाहीविरोधात लढण्याची मानसिक तयारी आहे का ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्राची दलाली सुरू आहे. याविरोधात ठाम भूमिका स्पष्ट केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू”, असं राऊत म्हणाले.
शर्मिला ठाकरेंचे अभिनंदन करतो
“आदित्य यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. भाजपाने आमच्या आदित्यवर कितीही आरोप केले तरी अशाप्रकारच्या घाणेरड्या आरोपांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे मी शर्मिला ठाकरे यांचे अभिनंदन करतो, असंही संजय राऊत म्हणाले.