अनेक प्राणी मृतावस्थेत; विरारमधील प्रकार
वार्ताहर, विरार : विरारच्या ग्लोबल सिटीमधील एका घरातून पोलिसांना अनेक मृत मांजरी आणि श्वानांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घरातून दुर्गंधी येत असल्याने इमारतीच्या रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या घरातून डांबून ठेवलेल्या २० मांजरी आणि १० श्वानांची सुटका केली असून घरातील तीन महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विरार पश्चिमेच्या रुस्तमजी ग्लोबल सिटीमधील एम अव्हेन्यू इमारतीच्या २०१ क्रमांकाच्या घरात शहनाज जानी ही महिला तिच्या दोन मुली आयेशा (२२) आणि फराह (२४) यांच्यासह मार्च २०१९ पासून भाडय़ाने राहात होती. हे घर बोरिवलीत राहणाऱ्या डेझी परेरा यांच्या मालकीचे आहे. शहनाज हिने घरात काही कुत्रे आणि मांजरी पाळलेल्या होत्या. या घरातून रात्री-अपरात्री सतत श्वान आणि मांजरीचे विव्हळण्याचे आणि भुंकण्याचे आवाज येत होते. तसेच काही दिवसांपासून त्यांच्या घरातून सतत दुर्गंधी येत होती. इमारतीच्या रहिवाशांनी घर मालक डेझी परेरा यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्राणिमित्र संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घरात प्रवेश करताच, त्यांना घरात कुत्रे आणि मांजरीचा संचार दिसला. घरात सर्वत्र कुत्रे मांजरींचे मल-मूत्र पसरलेले होते. त्याची दुर्गंधी येत होती. कुत्रे आणि मांजरींना घरात वाईट पद्धतीने ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी घरातून २० मांजरी आणि १० कुत्र्यांची सुटका केली. इमारतीत इतक्या मोठय़ा प्रमाणात प्राणी ठेवण्याची अनुमती नसल्याने शहनाज प्राण्यांना इंजेक्शन देऊन त्यांना बॉक्समध्ये भरून घरात आणत होती.
श्वान, मांजरींचा बळी?
सोमवारी पोलिसांना घरातील गोणीत तसेच इमारतीच्या आवारात असलेल्या कचऱ्याच्या कुंडीत मृत कुत्रे आणि मांजरीचे अवेशष सापडले. या प्राण्यांचा उपयोग बळी देण्याकरिता व जादूटोणा करण्याकरिता केला जात असल्याचा आरोप इमारतीच्या रहिवाशांनी केला आहे. मृत प्राणी अनेक दिवसांपासून घरात ठेवल्यामुळे त्याची दुर्गंधी येत होती. कुत्रे व मांजरी यांची अवस्था अतिशय वाईट असल्याकारणाने त्यांच्यावर देखील अत्याचार केले जात असल्याचे समोर आले आहे. घरात रक्ताचे डाग आढळून आले आहेत. या प्राण्यांच्या शरीरातून रक्त काढले जात असल्याचाही संशय आहे. मृत प्राण्यांचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. आम्ही आरोपी शहनाज जानी आणि तिच्या दोन्ही मुलींवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४२८ आणि ४२९ अन्वये तसेच प्राणी संरक्षण अधिनियमनाअंतर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी दिली. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आम्हाला घरात मृत मांजरी आणि कुत्र्यांचे अवशेष आढळले आहेत, सध्या सुटका केलेल्या प्राण्यांच्या पुनर्वसनाबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती विरारच्या उपअधीक्षका रेणुका यांनी दिली, ‘आम्ही जमेल ते सर्व प्रयत्न केले आहेत, प्राण्यांना वाचवण्याकरिता आम्हाला ५ ते ६ मेलेल्या मांजरी सापडल्या तसेच २ कुत्र्यांचे मृतदेह सापडले. इतर काही कुत्रे गंभीर आहेत व त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. महिलेने मांजरीचे रक्त काढलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अंगावर इंजेक्शनची निशाणीदेखील होती.’ प्राणीमित्र, अमित शहा.
‘बऱ्याच दिवसांपासून वास येत होता व महिलेला देखील वारंवार याबाबत विचारण्यात आले होते, परंतु तिने काहीच उत्तर न दिल्याने आम्ही घरात घुसलो व चौकशी केली.’ -रहिवासी सुदिप्ती सिंग