कर्जतसह तालुक्यात डेंग्यूच्या आजाराचे अनेक रुग्ण आढळले असून बर्गेवाडीमध्ये तर १२ रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात तालुका आरोग्याधिकारी भाऊसाहेब भोंडवे यांना विचारणा केली असता त्यांनी बर्गेवाडी येथील दोन रुग्ण नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहेत, मात्र त्यांचे अहवाल अद्यापि प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी माहिती देऊनही तालुका आरोग्याधिका-यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही, अशी तक्रार उपसभापती कांताबाई नेटके यांनी केली आहे.
कर्जत शहरात दोन वर्षांपूर्वी डेंग्यूच्या आजाराने धुमाकूळ घातला होता, आता त्याची पुनरावृत्ती झाली असून कर्जतसह आसपासच्या बर्गेवाडी, गायकरवाडी, रेहूकरी परिसरातील वाडयावस्त्यांवर तसेच चापडगाव येथेही संशयित रुग्ण खासगी दवाखान्यांमधून महागडे उपचार घेत आहेत. काही रुग्ण बारामती, नगर, पुणे येथे उपचारासाठी गेले आहेत. मात्र आरोग्य विभाग कोणतीच दखल घेण्यास तयार नाही, असे पदाधिकारी सांगतात.
 यासदंर्भात पंचायत समितीच्या उपसभापती नेटके म्हणाल्या, की आरोग्य विभाग हलगर्जीपणा दाखवत आहे. वास्तविक जिल्हा आरोग्याधिका-यांनी दिवाळीचा सण असला तरीही वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांना डयूटी करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र तालुका आरोग्याधिकारी येथे राहात नाही. त्याचा कारभारावर परिणाम झाला आहे. तातडीने आरोग्य कर्मचा-यांचे पथक तयार करावे व डासांच्या निर्मूलनासाठी फवारणी करावी, रुग्णांना आवश्यक असणा-या गोळ्या घरपोच कराव्यात, दवंडी द्यावी अशा सूचना त्यांना दिल्या, मात्र कोणतीच उपाययोजना केलेली नाही.
दरम्यान, भाऊसाहेब भोंडवे यांनी कर्जतमध्ये एकही रुग्ण नसल्याचे सांगताना फक्त बर्गेवाडी येथील दोन रुग्ण नगर येथे उपचारासाठी गेले आहेत, इतरांना फक्त ताप आहे, यासंदर्भात ग्रामविकास अधिका-यांना औषधे दिली असून फवारणी करण्याच्यासूचना दिल्या आहेत असे सांगितले. दोन कर्मचारी माहिती घेण्यासाठी नेमले असून ते घरोघरी फिरून माहिती घेत आहेत, तालुक्यात चांपडगाव येथे एक रुग्ण आहे, मात्र इतरत्र कोठेही डेंग्यूचा रुग्ण नाही असा दावा त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा