राज्यातील करोना संसर्ग एकीकडे झपाट्याने वाढत असताना, अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. सरकारकडून १०० टक्के लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण ऐच्छिक केल्यानं अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं आहे.
जालना येथे माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “कालच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन संदर्भात काहीही म्हणाले नाही. मात्र लॉकडाऊन लावताना समान नियम निकष हवे अशी मागणी पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकांनी नियम पाळावे.”
“पहिल्या डोसपासून ९८ लाख लोक वंचित आहेत. लसीकरण ऐच्छिक केल्यानं अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कायदेशीर दृष्टीने लसीकरण ऐच्छिक करता येईल का? याबाबत केंद्राकडे लेखी मागणी केल्याचं देखील ते म्हणाले. करोनाचा नवीन व्हेरीयंट हा म्युटेशनमधून तयार होतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या बैठकीत नवीन व्हेरीयंटला सामोरं जा असं आवाहन केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच, त्यानुसार राज्याचा आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे.” असंही देखील टोपे यांनी यावेळी सांगितलं.
“आरोग्य सुविधा मजबूत करणं, लसीकरण वाढण्याबाबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्याचं टोपे यांनी सांगितलं.आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्बंध जेवढे टाळता येईल तेवढे लावणं टाळा असं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं. ” असंही ते म्हणाले.
इंदुरीकर महाराजांच्या विधानावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…-
“मी माळकरी आहे आणि तिसरी लाट ही माळा काढणाऱ्यांसाठी आहे असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलंय यावर त्यांचं वक्तव्य हे सकारात्मक दृष्टीने घ्यावं असंही टोपे यांनी सांगितलं. इंदुरीकर महाराज हे शाकाहार घेत असल्यानं ते वक्तव्य शाकाहाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असावं असं टोपे यांनी म्हटलं. तसेच, ECRP 2 चा निधी वेगाने खर्च करण्यासाठी जटील अटी आणि शर्थी दूर कराव्यात अशीही मागणी कालच्या बैठकीदरम्यान करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर याच बैठकीत लस आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आल्याचे ते म्हणाले. होम टेस्ट किटच्या माध्यमातून घरच्या घरी करोना पॉझीटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळतं मात्र पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचं सांगत नाही. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह आलं आहे हे आरोग्य विभागाच्या रेकॉर्डवर येणं गरजेचं असून अशा कीट विकणाऱ्याकडून विकत घेणाऱ्यांच रेकॉर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगून, यासाठी देखील केंद्र सरकारने प्रयत्न करणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. राज्याला साडेसहा लाख कोव्हॅकसीन लसी मिळाल्या असून त्या मुंबईत आलेल्या आहेत. या लसी राज्यात वाटप केल्या जाणार आहेत. अजूनही लसींची आवश्यकता असून २ ते ३ दिवस हा साठा पुरेल.” असंही टोपे यांनी सांगितलं.
“मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणाची गती मंदावलेली असून १० दिवसांत फक्त १२ टक्के लसीकरण झालेलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यात लहान मुलांचे ४० टक्के लसीकरण झालं असून अशीच गती राहिल्यास १५ दिवसांत लसीकरण पूर्ण होईल असंही टोपे म्हणाले.