महाराष्ट्रातील मिंधे गँग, भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी यातून अनेकजण बाहेर पडतील असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरेंनी केलं आहे. सध्याचं सरकार सहा महिन्यांचं आहे. नोव्हेंबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. निवडणूक म्हणजे नांदी आहे. लोकसभा निवडणुकीत काय झालं ते आपण पाहिलं. आता खासदारांप्रमाणेच आमदार विजयी करुन आपल्याला मेळावा साजरा करायचा आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

विधानसभा निवडणूक जिंकणं सहज शक्य

खासदारांचा विजयी मेळावा घ्यायचा आहेच पण दोन आमदारांसह तो विजयी मेळावा घेऊ. मुंबईत एका जागेची गडबड आणि फ्रॉड झाला. ती लढाई सुरु आहे. निवडणूक आयोग भाजपा ऑफिसमधून चालतो का ते कळणार आहे. मी देखील अंगावर केसेस घेतल्या आहेत. पण आज तुम्हाला सांगतो की विधानसभा निवडणूक जिंकणं सोपं आहे. लोकसभेत गडबड झाली, कोणा एकाचा मेहुणा मोबाइल आत नेऊ शकतो त्याला आपल्याला आत टाकायचं आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी रवींद्र वायकरांना टोला लगावला.

वायव्य मुंबईतील निकालाची जगभर चर्चा; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मिंधे, भाजपा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेकजण बाहेर पडतील

सध्याचं सरकार फक्त सहा ते आठ महिनेच आहे. ज्यांना-ज्यांना वाटतं आहे, मिंधे सरकारने घोळ केला आहे, ते बाहेर पडतील, महाराष्ट्र प्रेमी बाहेर पडतील, अनेक खासदार बाहेर पडतील. भाजपची पार्लमेंट्री मिटींग झाली नाही, इंडिया आघाडीची झाली. जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो, स्पीकर तुमचा बनवा, नाहीतर भाजपाचा स्पीकर झाल्यास पहिला तुमचा पक्ष फोडतील. प्रियांका गांधी यांनी चांगला प्रचार केला, चांगली कामे केली आहेत. राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवार राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील. जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत, त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अमोल कीर्तिकरांबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“अमोल कीर्तिकरांच्या सीटबाबत कोर्टाची लढाई सुरु होणारच आहे. कारण ही जागा आम्ही जिंकलो आहोत. हुकूमशाहीच्या विरोधात मुंबईकरांनी जो निकाल दिलाय तो जगजाहीर आहे. मात्र यात जी गडबड झाली आहे त्यातल्या टेक्निकल गोष्टी आम्ही मांडू इच्छितो. निवडणूक निकाल आणि निवडणूक आयोग हे पाहिलं तर तर निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन नाही तर एंटरायली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन आहे. एका पक्षाच्या सांगण्यावरुन ते काम करत आहेत. सगळी गडबड करुनही इंडिया आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. ही गडबड झाली नसती तर सरकार बदललं असतं. ” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.