लोकप्रतिनिधी प्रचारात व्यग्र असल्याने पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश पाटील, वाडा

वाडा तालुक्यातील अनेक गावे, पाडय़ात आतापासूनच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. पाणीप्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी टंचाईग्रस्त भागांतील नागरिक शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींच्या दारी जात आहेत, मात्र अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामांत अडकले आहेत, तर लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात गुंतल्याने मतदारांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यानंतर पाऊस बेपत्ता झाल्याने नदी, नाले, विहिरींनी आतापासून पाण्याचा तळ गाठला आहे. काही नद्याही आटून गेल्या आहेत. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या नाणे, सांगे, गोऱ्हे, देवळी, आपटी, शिलोत्तर, उमरोठे अशा अनेक गावच्या नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

पाणी टंचाईग्रस्त गावांतील रहिवाशांनी पाणीटंचाईची समस्या सांगण्यासाठी येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने भेटू शकत नाही, तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, खासदार कपिल पाटील, खासदार राजेंद्र गावित हे लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. त्यांनी सध्या निवडणुकीशिवाय इतर विषयांवर बोलणेच बंद केले आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे पुढारी निवडणुकीत व्यग्र असल्याने पाणी टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा इतकीच मागणी या नागरिकांची आहे. परंतु त्यांच्या मागणीची दखल घ्यायला शासन-प्रशासन यांना कुणालाच वेळ नसल्याने आता न्याय मागायचा कुणाकडे या विवंचनेत पाणी टंचाईग्रस्त नागरिक अडकले आहेत.

नद्यांमधील खोल डोह असलेले पाणीही आता तळाला जाऊन पोहोचल्याने हा पाणीसाठा अजून १० ते १५ दिवसांपर्यंत पुरेल इतका आहे. नदीकाठच्या बहुतांशी गावातील विहिरीही आधीच कोरडय़ा पडलेल्या आहेत. त्यामुळे येथील अनेक गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे.

मोडकसागर धरणातून आणखी थोडे पाणी सोडले तर सांगे, नाणे, गोऱ्हे गावासह दहा ते बारा गावांवर आलेले पाणीसंकट दूर होईल.

– अनिल पाटील, माजी सरपंच, सांगे-नाणे ग्रामपंचायत

वाडय़ातील राजकीय पुढारी निवडणुकीत जेवढे लक्ष घालतात, तेवढे लक्ष येथील समस्यांवर घातले असते तर येथील नागरिकांवर ही वेळ आली नसती.

– भूपेश पाटील, ग्रामस्थ, नाणे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many villages in wada taluka experiencing severe water shortage