मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. “फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल”, असे आव्हानच मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी-शाह यांचा उल्लेख, मराठे काहीही करू शकतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरावेत, असा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे का? असाही प्रश्न माध्यमांनी जरांगे यांना विचारला. तेव्हा जरांगे म्हणाले की, मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत. आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.

मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

मनोज जरांगे पुढे म्हणाले, माननीय न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही काहीही करणार नव्हतो. माझ्या उपोषणाचा १५ वा दिवस असताना २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने १३ मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून २३ फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, ‘मनोज जरांगेला १० टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा.’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली.

“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”

सगळा सुपडा साफ होईल

“माझी मान जरी कापून नेली, तरी मी एक इंचभर मागे हटणार नाही. पण त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे देवेंद्र फडणवीस यांना दाखवून देऊ. त्यांचा सगळा सुपडा साफ होईल. या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातो. पण खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खुलासा केला की, शरद पवार यांच आंतरवाली सराटीमध्ये अपमान झाला. त्यांना उभ्या आयुष्यात कुणी एवढं बोललं नसेल, तेवढं बोललं गेलं. तुम्हीच एका तोंडाने बोलता त्यांचा अपमान झाला आणि दुसऱ्या तोंडाने तेच मागे असल्याचे सांगता. पण आमच्या मागे-पुढे कुणीही नाही”, असेही जरांगे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marahta reservation protester manoj jarange patil give challenge to devendra fadnavis once again rno news kvg