महाराष्ट्रातला मराठा समाज हा रक्ताने आणि नात्याने एक आहे आणि व्यवसायानेही एक आहे म्हणूनच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीमधल्या सभेत केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची जेव्हा मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं कायदा करण्यासाठी आधार लागतो. चार दिवसात कायदा होणार नाही. त्यामुळे एक महिना द्या अशी मागणी सरकारने केली होती. आपण त्यांना एक महिना नाही तर चाळीस दिवस दिले. आता २४ तारखेच्या आत कायदा मंजूर झालाच पाहिजे. आता सरकारने वळवळ करु नये, आरक्षण दिलं नाही तर आम्ही ते छाताडावर बसून घेऊ एवढं लक्षात ठेवावं असंही जरांगे पाटील म्हणाले.
बाकीच्यांना आरक्षण दिलं तेव्हा कुठले कागद घेतले?
१९६७ मध्ये बाकीच्यांना आरक्षण दिलं तेव्हा कागदपत्रं घेतली नव्हती. मंडल आयोगाने १९९० लाही कुठलाही कागद न घेता आरक्षण दिलं. मराठा समाज ही भारत देशातली अशी जात आहे जी १२ ते १३ टक्क्यांनी मागास सिद्ध झाली आहे. एकही जात मागास झालेली नसून त्यांना आरक्षण आहे. मराठा मागास सिद्ध होऊनही त्यांना आरक्षण नाही. ओबीसी प्रवर्गात जायचं असेल तर मागास जात असावी लागते तरच जाता येतं. मराठा जात मागास आहे हे सिद्ध झालंय. व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या, त्यावर आरक्षण दिलं. विदर्भातल्या आमच्या भावांना तुम्ही कशाच्या आधारे आरक्षण दिलं? असा प्रश्न विचारला असता एका मंत्र्याने मला सांगितलं त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग मी त्यांना म्हटलं की आमच्याकडे काय समुद्र आहे का? असंही जरांगे पाटील म्हणाले. आमचा व्यवसायही शेतीच आहे.
हे पण वाचा- “सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार, आता…”; मनोज जरांगे आक्रमक
आपलं शांततेचं युद्ध थांबवण्याची ताकद कुणातच नाही
मराठ्यांना जाणूनबुजून टार्गेट केलं गेलं. आता तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी सावध राहा. आपलं युद्ध हे शांततेचं आहे आणि जे थांबवण्याची ताकद राज्यात आणि देशात कुणामध्येच नाही. मी माझ्या समाजाच्या शब्दापुढे जाणार नाही. समाज माझ्यासाठी मायबाप आहे. मी तुम्हालाही सांगतो उद्या सकाळपासून आपल्या तालुक्यातले आणि जिल्ह्यातली गावं पिंजून काढा. त्यातल्या प्रत्येक घरातल्या मराठ्याकडे जाऊन आरक्षण समजावून सांगायचं. आपण एकत्र का यायचं हे सांगायचं. तर आंदोलन करताना शांततेत करायचं जाळपोळ करायची नाही. कारण गोरगरीबांच्या पोरांवर केसेस होतात, त्यांना पुढे अडचण येते. सर्वात महत्त्वाचं हे की एकाही मराठ्याच्या पोराने आत्महत्या करायची नाही असंही आवाहन जरांगे पाटील यांनी बारामतीत केलं.
आपलं शांततेचं युद्ध हे सरकारला २४ तारखेनंतर झेपणारही नाही, पेलणारही नाही. गाफिल राहू नका, आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. सगळ्यांनी सावध राहा. आपल्याला पुढे काय करायचं आहे? आपल्या आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला सांगणार. कारण पाठीत खंजीर खुपसणं हा आपला स्वभाव नाही. जे करणार आहोत ते आपण सरळ सांगत असतो. तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की या वेळी पक्ष, गट-तट सगळं सोडा, भांडणं विसरा. आरक्षण आपल्या पदरात पडलं पाहिजे ही संधी सोडू नका. असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनीही केलं. आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.