Latest Marathi news विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्याने जनतेला न्याय द्यायचा असतो. हक्काचं न्यायमंदिर आहे, मात्र तेच (विजय वडेट्टीवार) गर्व करत आहेत. मी मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही म्हणत आहेत असा विरोधी पक्षनेता असतो का? असा सवाल आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेत्याकडेच जनता आशेने पाहात असते. सरकारने न्याय दिला नाही तर सगळे जण विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागत असतात. राहुल गांधींनी विजय वडेट्टीवारांना हेच शिक्षण त्यांना दिलं आहे का? असा प्रश्नही मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी काय बोलायचं? त्यांनी जनतेच्या वतीने बोललं पाहिजे. पण त्यांना गोर-गरीब आठवत नाहीत बहुदा. ते फक्त राजकारण करत आहेत. मराठ्यांनी आता या सगळ्यांना ओळखलं आहे. आंतरवलीत म्हणाले होते ओबीसीतून मराठा आरक्षण द्या. त्यानंतर कसा रंग बदलला हे जनतेला माहीत आहे. ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही असा विरोधी पक्षनेता कुठेही नसतो. गायकवाड आयोगही बोगस आहे हे तुमचंच म्हणणं आहे. विजय वडेट्टीवार यांची विचारधारा ही विष पेरणारी आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते राजकारणासाठी सगळं करत आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या मनात मराठ्यांबाबत माया नाही. विजय वडेट्टीवारांनी आता मराठ्यांना सल्ले द्यायचं बंद करावं असंही जरांगे म्हणाले.
विजय वडेट्टीवार भाजपात जाऊ इच्छित आहेत का? त्यामुळे ते सरकारच्या बाजूने बोलत आहेत. आम्हाला कशाला तुमच्या राजकारणात ओढता? आम्ही राजकारण केलेलं नाही. मराठ्यांना मराठवाड्यात आरक्षण मिळत होतं. मात्र मी सगळ्या समाजासाठी आरक्षण द्या हे सांगितलं त्यानंतर आंदोलन राज्यभर नेलं. असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा तरुणांना कुणीही सल्ले देऊ नये. मराठा पोरांना बुद्धी आहे. मराठ्यांविषयी तुमच्या मनात किती राग आहे हे मराठ्यांच्या पोरांना माहीत आहे. तुम्ही मराठ्यांचा किती द्वेष करता हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही हिरो झालो नाही आणि मराठे हिरो समजत नाहीत. आमचं आंदोलनही तुम्हाला मिळून संपवायचं होतं. आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायासाठी डोकी फुटली तरी लढायचं ठरवलं. मराठ्यांमध्ये तुम्ही हयातभर आणि तुमची पुढची पिढी संभ्रम निर्माण करु शकत नाही. कारण तुम्हाला (विजय वडेट्टीवार) ओळखून चुकला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. राजकीय स्वार्थापोटी तुम्ही काही पाच सहा नेत्यांनी मराठ्यांचा कसा वापर केला हे सगळ्यांना माहीत आहे. मराठ्यांच्या पोरांना चांगलं माहीत आहे कुणाच्या मागे उभं राहायचं. मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पाडले पाहिजेत असं विजय वडेट्टीवार आणि तुम्हा पाच सहा लोकांना वाटतं हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कुणाला सल्ले देऊ नका. मराठ्यांच्या मुलांना कुणाच्या मागे उभं राहायचं माहीत आहे. असंही जरांगे पाटील म्हणाले.