मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमधल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. छगन भुजबळ यांना जेव्हा विचारण्यात आलं की मनोज जरांगे पाटील हे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत तेव्हा ते म्हणाले की त्यांचं स्वागत आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं होतं. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं नाव घेता टीका केली. तू कुठे भाजी विकायचा, कुणाचे बंगले बळकवले?, मुंबईत तुम्ही काय केलं?, कोणत्या चित्रपटात नाटकात काम केलं? हे मला माहीत आहे. २०१६ मधल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची आठवणही जरांगे पाटील यांनी केली. महाराष्ट्र सदनात घोटाळा केला म्हणून तुरुंगात जावं लागलं, असंही ते म्हणाले.
आता व्यक्ती म्हणूनही आमचा विरोध
आधी व्यक्ती म्हणून त्यांचा विरोध करत नव्हतो त्यांच्या भूमिकेला विरोध होता. आता व्यक्ती म्हणूनही त्यांचा विरोध आम्ही करतो आहोत. कारण मराठा-ओबीसी वाद होतील अशी वक्तव्य तो माणूस करतो आहे. कायदा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही दंगली होतील यासाठीची वक्तव्यं करु लागला. ३०-३५ वर्षे तुम्ही सत्ता भोगली आहे. तरीही त्यादिवशी तुमच्या पोटातली गटारगंगा तु्म्ही त्या दिवशी दाखवलीत असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठे जातीय दंगली या राज्यात होऊ देणार नाहीत हे लक्षात ठेवा.
ओबीसींना किती समस्या आहेत माहीत आहे का? ज्यांना फायदा मिळाला त्यांना मिळाला बाकीच्यांचं हा ओरबाडून खातोय. तरीही म्हणतो मला कमी पडतं आहे. आपण दंगली कराव्यात हा यांचा उद्देश आहे. पण तू कितीही विरोध कर आम्ही आरक्षण मिळवणारच. म्हाताऱ्या माणसाने आता बोलू नये, जास्त बोलू नये, पाणी कमी पडू शकते. आता नाही, आरक्षण मिळू द्या मग बघतो. यांचं आपल्याला सगळं माहिती आहे आड येऊ नको. तुमच्या एकाही महाविद्यालयाला सावित्रीबाईंचे नाव का दिलं नाही? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.