मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली आहे. त्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे भाषणाच्या ठिकाणी आले. त्यांचं भाषण सुरु झालं आहे. महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यातले ३० दिवस संपले आहेत. आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आता मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
काय आहेत मनोज जरांगेंच्या मागण्या?
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांनी सांगितलेला निधी, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी द्यावी
दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
सारथी संस्थेमार्फत पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे.
आज आपल्या आयुष्यातला सुवर्णक्षण
आज आपल्याला महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून आपण इथे सगळे जमलो आहोत. आज मराठा समाजासाठीचा सुवर्णक्षण आला आहे. या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झाला आहे. घराघरांतला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून सांगणार आहे की मी माझ्या नातवासाठी, मुलासाठी ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झालो आहे. आरक्षणासाठी मराठा पेटून उठला आहे. महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात १० दिवस आहेत. आज जो जनसमुदाय आंतरवलीत आला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या दहा दिवसात मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करा.
मराठा समाजाने जो शब्द दिला आहे त्यावर मराठा समाज ठाम आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवसांत आम्ही काहीही विचारणार नाही हे सांगितलं होतं आम्ही तो शब्द पाळला आहे. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज कार्यक्रम स्थळी येत आधी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरु केलं.