मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मनोज जरांगेंनी पोखरणी, लिमला, परभणी आणि झिरो फाटा या पाच ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. परभणी संवाद बैठकीत बोलताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मनोज जरांगेंनी फेब्रुवारी महिन्यात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी अपशब्द गेल्यानंतर दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यावेळी मनोज जरांगे चांगलेच चर्चेतही आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले मनोज जरांगे?

“मी मरेपर्यंत माझ्या बांधवांना साथ देणार आहे. तसंच सगेसोयऱ्यांची मागणी सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपल्याइतका सन्मान कुणीच केला नसेल. त्यांनी ३० दिवस मागायचे आपण ४० दिवस द्यायचे. त्यांनी दोन महिने मागायचे आपण अडीच महिने द्यायचे, त्यांनी एक महिना मागायचा आपण दीड महिना द्यायचा. त्यांनी तीन महिने मागायचे आपण साडेतीन महिने द्यायचे आपण त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू दिला नाही. मात्र सरकारने आरक्षण दिलं का? तर नाही दिलं. माझ्या मराठा समाजाची फसवणूक केली. तरीही मराठा समाजाला वाटतं आहे की मराठा समाजाला एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात. ते शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या नादाने काय म्हणतात? मनोज जरांगेशी मला घेणंदेणं नाही. जो असं करतो त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. माझा? मी पण सांगितलं जो असं बोलतो त्याचा करेक्ट कार्यक्रम मराठा समाज करतो. एकनाथ शिंदेंची इतकी इज्जत मराठा समाजात होती. मी बोललो होतो देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे कशाला मधे बोलले? काय दिलं तुम्ही? ७५ वर्षे मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळालेलं नाही. मराठ्यांनी या नेत्यांना मोठं केलं. गाड्या, घोड्या, बंगले, यांची मुलं परदेशात, मराठ्यांना काय मिळालं?” असं मनोज जरांगे म्हणाले.

हे पण वाचा- Manoj Jarange on CM Shinde: “…म्हणून एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले”, जरांगेंचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांना आव्हान

देवेंद्र फडणवीसांना माझं खुलं आव्हान आहे. देवेंद्र फडणवीसांनी हिंमत असेल तर आठ दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावं. मग तुम्हाला कळेल की उपोषण म्हणजे काय असतं, हवा कुठून बाहेर जाते आणि कुठून श्वास घेता येतो. वजन कमी करायचं असेल तर या माझ्या बाजूला आणि उपोषण करा. गृहमंत्री म्हणून म्हणालात की आई बहिणींची भाषा मी वापरली. माझा त्यांना सवाल आहे दोन वर्षांच्या मुलीच्या पायात गोळी शिरली होती. ती आई बहीण वाटली नाही? तुम्हाला काय करायचं ते करा मी आरक्षण घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आमच्या आया बहिणींना नीट चालता येत नाही. लाठीचार्जमध्ये त्यांच्या पायांवर डोक्यांवर वार झाले आहेत. तेव्हा आई-बहीण दिसली नाही का? तुमची मराठ्यांविषयीची नियत आम्हाला दिसली. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तुम्ही फक्त दहा दिवसांसाठी निलंबित केलं. असाही आरोप मनोज जरांगेंनी केला. माता-भगिनींना आज मी सांगतो, ज्या पोलिसांनी आपल्या माता भगिनींना मारलं होतं त्यांना देवेंद्र फडणवीसांनी बढती दिली. माता माऊल्यांना मारणाऱ्यांना एसपीला पुण्यात बढती दिली असंही वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha aanolka manoj jarange open challenge to devendra fadnavis about fast rno news scj
Show comments