मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणील बळ देतानाच राजकीय नेत्यांविरोधात गावबंदीचे तट अधिकच भक्कम होऊ लागले आहेत. याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसत आहे.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते आज, शनिवारी होणार होता. मात्र, मराठा क्रांती मोर्चानं अजित पवार यांना कारखान्यात येण्यास विरोध केला असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : “मी सरकारला शेवटचं सांगतो…”, मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
त्याच पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा : “…तेव्हा अजित पवारांनी मोदींसमोर मंचावरून उठून निघून जायला हवं होतं”; राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले…
मराठा आंदोलकानं ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितलं, “आम्ही दोन दिवसांपूर्वी कारखाना आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं. त्यानुसार शुक्रवारी पोलीस आणि कारखाना प्रशासनाबरोबर बैठक पार पडली. पण, अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना मोळी पुजणास आणण्यासाठी कारखाना प्रशासन आग्रही होते. कारखाना प्रशासन राजकीय नेत्यांना बोलवत असेल, तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. गाड्यांना आडवू किंवा लाठ्या-काठ्या खाण्यासाठी आमची तयारी आहे.”
दरम्यान, मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केला. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर भागातील जिजाऊ निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहेत. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.