राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी रात्री राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मात्र, या बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. तसेच आरक्षणाच्या मुद्यांवर विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र, सरकारने काँग्रेसची ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. “सगेसोयरे अध्यादेश काढला तर आम्ही मुंबई जाम करुन टाकू”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
लक्ष्मण हाके काय म्हणाले?
“सर्वपक्षीय बैठक काल झाली, असं आम्हाला समजलं. या बैठकीला सत्ताधारी पक्षातील नेते होते. पण विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मला वाटतं की विरोधकांनीही या बैठकीला उपस्थित राहून ओबीसींबाबतची ठाम भूमिका मांडायला हवी होती. आम्ही ओबीसींसाठी १० दिवस उपोषण केलं. त्यावेळी राज्य सरकारने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं. मला माहिती कळती आहे की सरकार सगेसोयरे संदर्भातील अध्यादेश आणत आहे. मग त्यामधील ड्राप्ट काय आहे? त्यामध्ये काय लिहिले आहे? हे पाहावं लागेल”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
हेही वाचा : “राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी…”, मुख्यमंत्री शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका
सगेसोयरेंचा अध्यादेश आला तर…
“मी जबाबदारीने बोलतो की, सगेसोयरे हा अध्यादेश जर आला तर संपूर्ण ओबीसी आरक्षण संपवणं हा याचा हेतू अशू शकतो. त्या पलिकडे जाऊन बोगस कुणबी नोंदीद्वारे ओबीसींचं आरक्षण सरकारने संपवलं आहे. बोगस कुणबी नोंदी असतील किंवा सगेसोयरे हा अध्यादेश असेल या महाराष्ट्रामधील बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त जाती जमातींचं २९ टक्के जे आरक्षण आहे, ते संपवण्याचा घाट सरकारने घातला आहे. मात्र, आमचा याला विरोध आहे. सगेसोयरे अध्यादेश जर आला तर आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू आणि मुंबई जाम करुन टाकू”, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला.
ओबीसींना विश्वासात घ्यावं…
“आम्ही राज्य सरकारची वाट पाहत आहोत. राज्य सरकारने ओबीसींना विश्वासात घ्यावं. ओबीसी एकत्र येत नाही आणि कोणीतरी झुंडशाही करतं म्हणून त्यांच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही काही करायला गेलात तर हे घटनेच्या विरोधात आहे. जे काही सुरु आहे ते बेकायदेशीर सुरु आहे. हे मी वेळोवेळी मांडत आलो आहे. मुख्यमंत्र्यांनी १२ कोटी जनतेचं दायित्व स्वीकारलेलं आहे. तेव्हा तुम्ही एका जातीचं नेतृत्व करत नाहीत याचं भान ठेवा”, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला.