मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी आपण बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र काहीतरी आत शिजतं आहे कारण मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतं आहे? असा सवाल आता मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरक्षणासाठी बैठक घेण्याची गरजच नाही. त्यांनी फक्त एक फोन करायचा आहे की मराठ्यांना आरक्षण द्या. लगेच आरक्षण मंजूर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळमळ दिसते आहे. मात्र काहीतरी आत शिजतं आहे. नाहीतर त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली नसती. १०० टक्के मला खात्री आहे. मी उगाच कुठलेही आरोप करत नाही. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आज ४१ वा दिवस उजाडला आहे
सरकारला गांभीर्य असतं तर ४१ वा दिवस उजाडलाच नसता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कुणीतरी अडवतंय हे खरं दिसतं आहे. कारण इतके दिवस मराठा आरक्षणासाठी लागलेच नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोर-गरीबांची जाण आहे. आम्ही त्यांनाही साद घातली होती. पण अद्याप त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्यांना आमची जाणीव नसावी असंही जरांगे पाटील माध्यमांना म्हणाले.
एकनाथ शिंदेंना कोण अडवतं आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी शपथ त्यांच्या भाषणात घेतली त्यावरुन आम्हालाही वाटलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षण देण्याबाबत गंभीर आहेत. आता त्यांना अडवतं कोण आहे? हा प्रश्न आहे. आम्हाला सरकारच्या प्रतिनिधींकडून काही फोन आलेलं नाही. गिरीश महाजन यांचा परवा फोन आला होता पण कार्यक्रमात असल्याने उचलता आला नाही. त्यांच्याशी चर्चा करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आम्ही सन्मान करतो. मात्र मराठ्यांना आरक्षण देण्यापासून त्यांना कोण अडवतंय हे आम्हाला शोधायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द दिला की ते पाळतात ही त्यांची ख्याती आहे. मात्र आम्हाला आमच्या लेकराबाळांची काळजी आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.