मराठ्यांना आरक्षण असतानाही पुरावे लपवून ठेवण्यात आले. समित्यांनी पुरावे शोधण्याचं काम केलं. पण, सरकारकडे अहवाल आल्यावर पुरावे नसल्याचं सांगितलं जायचं. मग, आता कसं काय पुरावे आढळत आहेत? याचं उत्तर सरकारने द्यावे, असं आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिलं आहे. सत्तर वर्षे आमचं वाटोळं कुणी केलं, असा सवालही जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.
“सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव”
जरांगे-पाटलांची सातारा येथे सभा पार पडली. तेव्हा संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले, “ज्यांनी आरक्षण समजून घेतलं, त्यांच्या पिढ्या सुधारल्या. मराठ्यांना ७० वर्षापासून आरक्षण होतं. पण, जाणूनबुजून षडयंत्र रचण्यात आलं. ७० ते ७५ वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही. आमचं आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? आरक्षणासाठी आमच्या तरूणांचे मुडदे पडत आहेत.”
हेही वाचा : राजेश टोपे अन् रोहित पवारांचा उल्लेख करत भुजबळांनी केला ‘तो’ आरोप, जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…
“…म्हणून षडयंत्र रचण्यात आलं आहे”
“आता लाखांनी नोंदी आढळून येत आहेत. मराठ्यांना दोन अंग आहेत. मराठा क्षत्रिय असल्याने त्यांना लढायचं सुद्धा माहिती आहे. मराठा समाज शेतीही करतो. पण, मराठ्यांची मुलं मोठी झाली, तर आपलं काय होणार? म्हणून षडयंत्र रचण्यात आलं आहे. मराठ्यांना आरक्षण असतानाही पुरावे लपवून ठेवण्यात आले. समित्यांनी पुरावे शोधण्याचं काम केलं. पण, सरकारकडे अहवाल आल्यावर पुरावे नसल्याचं सांगितलं जायचं. मग, आता कसं काय पुरावे आढळत आहेत? याचं उत्तर सरकारने द्यावे,” असं आव्हान जरांगे-पाटलांनी सरकारला दिलं आहे.
हेही वाचा : “तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे-पाटील म्हणाले…
“मराठ्यांनी गाफील राहू नका”
“सत्तर वर्षे आमचं झालेलं नुकसान सरकार कसे भरून काढणार आहे? आमच्या जागा कुणी बळकावल्या? २४ डिसेंबरला सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा तयार करणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी गाफील राहू नका,” असं आवाहनही जरांगे-पाटलांनी केलं आहे.