सोलापूर : ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाने आता आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारचे नाक दाबण्याचे ठरवून असून त्याचाच भाग म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार ऑनलाइन अर्ज भरणार आहेत. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड हजार मराठा उमेदवार अर्ज भरणार आहेत. याबाबतचा निर्णय रविवारी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक झाली. महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सगेसोयऱ्यांचा समावेश नाही. तर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे, असा सकल मराठा समाजाचा आग्रह कायम आहे. या प्रश्नावर मराठा आरक्षण आंदोलन होत असताना सरकारकडून आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून सकल मराठा समाजाने सत्ताधारी भाजप व मित्र पक्षांची लोकसभा निवडणुकीत कोंडी करण्याचे ठरविल्याचे समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सांगितले.
हेही वाचा…‘कसली रे कोयता गँग, यांचा सुपडाच साफ करतो’; अजित पवारांची पुण्यातील गुन्हेगारांना तंबी
त्याचाच भाग म्हणून थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघात शेकडो मराठा बांधव ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यातून मोदी यांची निवडणूक ईव्हीएम यंत्रपेटीऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास निवडणूक आयोगाला प्रवृत्त केले जाणार आहे.
याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघातही दीड हजार उमेदवारी अर्ज भरले जाणार असून त्यासाठी प्रत्येक गावातून अर्ज दाखल करण्याची तयारी असल्याचे माऊली पवार यांनी सांगितले. माढा मतदारसंघात निवडणूक मतदानाच्या दिवशी सकल मराठा समाजाकडून प्रत्येक मतदान केंद्रात दीड हजार पोलिंग एजंट तैनात करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. सोलापूर लोकसभेची जागा राखीव असल्यामुळे येथे मराठा समाजाचे उमेदवार राहणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…अकोल्यात भाजपच्या उमेदवारीत धक्कातंत्र ?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याच उद्देशाने लोकसभा निवडणुकीत थेट पतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आग्रह असताना त्यामागे सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचा हेतू नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. या बैठकीस पुरूषोत्तम बरडे, रवी मोहिते, श्रीकांत डांगे यांच्यासह मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.