गुजरातमधील पटेलांप्रमाणेच महाराष्ट्रातील पाटीलांनी एकत्र यावे, असे विधान करीत बुधवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला. सध्या गुजरातमध्ये पाटीदार समाजाला ओबीसी गटात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी गुजरातमध्ये ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन उभे करणाऱ्या पटेल समाजाचे कौतूक केले. जसे गुजरातमध्ये पटेल समाज त्यांच्या हक्कासाठी एकत्र आला, तसे महाराष्ट्रातील पाटीलांनी एकत्र यावे, असे म्हणत राणेंनी यावेळी मराठा समाजाला चेतविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, सध्या सत्तेमध्ये अनुभवहीन लोक आहेत अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. नारायण राणे सध्या मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लातूर, बीड आणि उस्मानाबादसाठी सरकारने विशेष पॅकेज देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे, खरीपाचे पीक शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत काँग्रेस शेतकऱ्याच्या बरोबर असेल, असे आश्वासनही दिले.

Story img Loader