धाराशिव : सगेसोयरे कायद्याच्या बाजूने कोण होते, आणि विरोधक कोण होते? हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे सगेसोयरे कायद्याच्या बाजूने आहेत, त्यांना मराठा समाज सहकार्य करेल आणि मराठाद्वेषी आणि सगेसोयरे कायद्याला विरोध करणार्यांना या निवडणुकीत पाडल्याशिवाय मराठे स्वस्थ बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मराठायोध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.
मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील हे सोमवारी धाराशिव दौर्यावर होते. मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठ्यांचा द्वेष मनात ठेवून आरक्षणाच्यावेळी ज्यांनी ज्यांनी टीका केली. त्या विरोधकांना निवडणुकीत मराठा समाज आपली ताकद दाखवून देईल. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याचा विषय ज्यांना ज्यांना पटला नाही, त्यांना यावेळच्या निवडणुकीत मराठा समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांच्या एकजुटीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यात सभा घेत फिरावे लागत आहे. यातच मराठा समाजाचा विजय असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आणखी वाचा-“आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
मराठा समाज भाजपविरोधी नाही
मराठा समाज भाजपविरोधी नाही. जर मराठा समाज भाजप विरोधी राहिला असता, तर विधानसभेत १०६ आमदार सत्तेत राहिले नसते. सत्तेवर मराठा समाजानेच बसविले आणि नंतर मराठा आंदोलकांचे डोके फोडायचे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, हे सहन केले जाणार नाही. त्यामुळे आता जे मराठद्वेषी त्यांच्या विरोधात मराठा समाज आणि जे सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने आहेत, त्यांना मराठा समाज मतदान करेल, असेही जरांगे म्हणाले.