मराठय़ांनो उद्योजक बना हा विचार घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अधिवेशन येत्या २५ व २६ मे रोजी नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तब्बल २० वर्षांनी घेण्यात येत असलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आध्यात्मिक गुरु भयुजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख प्रणय सावंत यांनी दिली.
या अधिवेशनात प्रामुख्याने मराठा आरक्षण, दुष्काळ, दुर्लक्षित किल्ले व अण्णासाहेब पाटील आर्थिक दुर्बल विकास महामंडळ या विषयांवर चर्चा होईल. परंतु त्याही पलीकडे जाऊन मराठा समाजाची आर्थिक दुर्बलता नष्ट करण्यासाठी मराठय़ांनो उद्योजक बना हा नवा कार्यक्रम राबविण्यासाठी नवे मिशन स्थापन करण्याचा विचार आहे. खेडय़ात भागत नाही म्हणून शहराकडे वळलेल्या या समाजाला मुंबई-पुण्यात साधी खोली घेण्याची ऐपत राहिली नाही. वाडय़ावरच्या खानदानी मराठय़ांना शहरांमधून गचाळ वस्तीत राहावे लागत आहे. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजात उद्योजक बनविण्याची नवी मानसिकता तयार करण्याकडे अधिवेशनाचा खास रोख राहणार आहे.
अॅड. शशिकांत पवार यांनी परभणीच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत स्वेच्छानिवृती स्वीकारत अध्यक्षपदाची जबाबदारी किशनराव वरिखडे यांच्यावर सोपवली. नंतरच्या काळात महासंघात दुरावा निर्माण झाल्याने दोन तट पडले. यामध्ये बराच काळ वाया गेला. त्यानंतर शेवटी १९९८ मध्ये सोलापूरच्या कार्यक्रमात अॅड. शशिकांत पवार यांना पुन्हा अध्यक्षपदावर आणावे लागले. १९९३ पासून मधल्या काळात महासंघाचे अधिवेशन झाले नाही. या वेळी नाशिक येथे होणारे हे अधिवेशन एक नव्या वळणाचे व समाजात परिवर्तन घडविणारे ठरेल, असा विश्वास प्रणय सावंत यांनी व्यक्त केला. या अधिवेशनात विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्यासह सरखेल कान्होजी आंगे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांतून प्रतिनिधी हजेरी लावतीलच, शिवाय महाराष्ट्राबाहेरील चेन्नई, कर्नाटक, इंदूर, धार, देवास येथूनही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्ह्य़ातून जास्तीत जास्त प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहावेत याकरिता जिल्हाध्यक्ष व्ही. टी. देशमुख, रणजितसिंह जाधवराव परिश्रम घेत आहेत.
मराठा महासंघाचे अधिवेशन नाशकात
मराठय़ांनो उद्योजक बना हा विचार घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अधिवेशन येत्या २५ व २६ मे रोजी नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. तब्बल २० वर्षांनी घेण्यात येत असलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आध्यात्मिक गुरु भयुजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे,
आणखी वाचा
First published on: 23-05-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha federation session in nashik