बारामती : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीमाराच्या घटनेचे पडसाद म्हणून बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती कडकडीत बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षण देण्यास सरकार असमर्थ असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
बारामतीमधील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. भाजी मंडई आणि बाजारपेठ बंद होती. काही शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. बारामती शहर कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मराठा आंदोलकांनी सकाळी भव्य मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलावरून गुणवडी चौक, महावीर पेठ रस्त्यावरून महात्मा गांधी चौक या मार्गाने भिगवण चौकात मोर्चा विसर्जित झाला. तेथे सभेमध्ये रूपांतर झाले.
राज्य आणि केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी सर्व निवडणुकांवर मराठा समाज बहिष्कार टाकेल. एकही मराठा मतदार निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलनकर्त्यां कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणांतून मांडली. मराठा मोर्चा आंदोलन कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
हेही वाचा >>>संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये पुन्हा ‘अदानी’?
लोणावळा, मावळ तालुक्यात बंद
सोमवारी मावळ तालुका आणि लोणावळय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. लोणावळा शहर, कामशेत, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगर या भागात सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा आणि शाळा वगळता सर्व दुकाने, उपाहारगृह, रिक्षा, टॅक्सी, कंपन्या, भाजी मंडई असे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सर्वानी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. मावळात शहर आणि ग्रामीण भाग पूर्णपणे बंदमध्ये सहभागी झाला होता.