विदर्भात मोठय़ा संख्येत असलेल्या कुणबी समाजाला दुय्यम वागणूक देण्याच्या भूमिकेमुळे राज्याच्या उपराजधानीत मोठा गाजावाजा करून निघालेला मराठा क्रांती मूक मोर्चाला अपेक्षित यश मिळाले नाही. आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटीच्या मुद्दय़ावर साऱ्या राज्यात मराठा कुणबी एकजूट दाखवत असताना येथे मात्र संयोजकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे अनेक जण इच्छा असूनही या मोर्चाकडे फिरकलेच नाहीत.

कुणबी व मराठा एकच आहेत, केवळ प्रादेशिक विभागणीमुळे जात लिहिण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे, अशी भावना या दोन्ही समाजात खोलवर रुजली आहे. त्याचाच आधार घेत मराठा क्रांती मूक मोर्चे विदर्भात निघायला सुरुवात झाली तेव्हा स्थानिक आयोजकांनी चतुराई दाखवत या मोर्चाचे नामकरण मराठा कुणबी असे केले. त्याचा परिणामही लगेच दिसून आला व पश्चिम विदर्भात लाखोचे मोर्चे निघाले. पूर्व विदर्भात चंद्रपूर व वध्र्यात हाच प्रयोग यशस्वी ठरला. उपराजधानीत मात्र कुणबी या शब्दावरून प्रारंभीच वाद झाला. येथील मोर्चाच्या संयोजनासाठी भोसले घराण्यातील राजे मुधोजी यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनीच मोर्चाच्या फलकावर कुणबी हा शब्द चालणार नाही अशी भूमिका घेतली. कुणब्यांनी मोर्चात सामील व्हावे, पण त्यांची संख्या मोठी म्हणून त्यांना नेतृत्व करू दिले जाणार नाही असेही भोसले यांचे म्हणणे होते. यामुळे मोठय़ा संख्येत असलेल्या कुणबी समाजाला सोबत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मराठा नेत्यांचा नाईलाज झाला. यापैकी अनेकांनी नंतर अंग काढून घेतले. मोजकीच मंडळी हाताशी उरलेल्या संयोजकांनी मग मोर्चाच्या यशासाठी प्रयत्न केले पण ते सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचू शकले नाही.

श्रेष्ठत्वाच्या मुद्दय़ावरून संघर्ष

श्रेष्ठत्वाच्या मुद्दय़ावरून मराठा व कुणबी समाजात कायम सुप्त संघर्ष सुरू असतो. त्यातूनच हा डावलण्याचा प्रकार घडला, असा समज करून घेत कुणबी समाज संघटनांनी चक्क पत्रके काढून या मोर्चात सामील होऊ नये असे आवाहन केले. त्याचा मोठा परिणाम दिसून आला. विदर्भात कुणबी समाजातसुद्धा भरपूर पोटजाती आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यापैकी बहुसंख्य मोर्चापासून दूर राहिल्या. येथील मोर्चाची तयारी सुरू असतानाच ठाण्यातील मोर्चात कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळावी अशी मागणी समोर आली. त्यामुळे आणखीच गोंधळ उडाला आणि ज्यांची जाण्याची इच्छा होती तेही या मोर्चाकडे फिरकले नाहीत. इतर ठिकाणचे मोर्चे यशस्वी करण्यामागे सर्वपक्षीय केंद्रीय समितीचा सिंहाचा वाटा होता. येथे अशी समितीच कार्यान्वित होऊ शकली नाही. आयोजकांचा कुणबी समाजाबाबतच दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे, हे लक्षात आल्याने विविध पक्षात असलेले मराठा नेते या मोर्चाच्या आयोजनात सक्रियच झाले नाहीत. या नेत्यांनी मोर्चा सुरू होण्याच्या व शेवट झाला त्या ठिकाणी केवळ भेट देऊन हजेरीचा उपचार पाळला. आता निवडणुकीच्या काळात कुणब्यांना नाराज कसे करायचे असे एका नेत्याने बोलूनही दाखवले. कुणबी शब्दावरून वाद झाल्याने आयोजकांपैकी काहींनी मराठा कुणबी मोर्चा १४ डिसेंबरला निघेल असे आधीच जाहीर केले होते. त्याचाही फटका या मोर्चाला बसला. संख्या मोठी असली तरी जात व पोटजातीवरून भांडत राहण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील मोर्चात १० ते १५ हजारांची गर्दीच जमू शकली व या निमित्ताने राज्यभर निर्माण झालेल्या एकजुटीला प्रथमच तडे गेले.