शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदू गर्व गर्जना संवाद यात्रेदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील” असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे समाजात रोष निर्माण झाला असून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ समज द्यावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिला आहे.

विनोद पाटील यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आगळंवेगळं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, मागच्या काळात जेव्हा त्यांना मंत्री व्हायचं होतं, तेव्हा हेच मराठा तरुण कार्यकर्ते तुमच्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जात होते, हे आपण विसरला आहात का? कुणाच्या ताकदीवर आणि कोणत्या गैरसमजात आपण हे वक्तव्य केलं आहे? हे वक्तव्य अतिशय खालच्या दर्जाचं आहे.

हेही वाचा- “अजित पवार वस्तुस्थिती जाणणारे नेते”, फडणवीसांवरील ‘त्या’ विधानावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“मराठा समाजातील ५० पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान देऊन हा मराठा क्रांती मोर्चा उभा केला आहे. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचं आहे आणि कुणाचं नाही, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. राज्यात कुणाचंही सरकार आलं तरी मराठा समाजाच्या तरुणांची मागणी आरक्षणाचीच होती आणि आरक्षणाचीच आहे. आरक्षण मिळेपर्यंत ही मागणी कायम राहील. आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे. आमचं आरक्षण ओबीसीतून टिकणार असेल तर मराठा तरुण ओबीसीतून आरक्षण मागतील,” अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा-“माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

तानाजी सावंतांना उद्देशून विनोद पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात, एक जबाबदार व्यक्ती आहात. तुमच्या अशा वागण्यामुळे मराठा समाजदेखील बदनाम होतोय. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, आपण तानाजी सावंतांना तत्काळ समज द्यावी. अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील, याची काळजी राज्यसरकारने घ्यावी.

Story img Loader