गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना संभाजीराजे छत्रपती या मुद्द्यावर सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. शुक्रवारी रात्री देखील या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती आणि मराठा मोर्चाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बोलूच दिलं नसल्याचा आरोप नंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी केला आहे. तसेच, छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याचा दावादेखील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चाच झाली नसल्याची तक्रार मराठा संघटनांच्या नेतेमंडळींनी केली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक बोलावलेली असताना सर्वांना बोलू द्यायला हवे होते. मात्र, समाजाच्या लोकांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असा दावा केला जात आहे.

“रात्रीच्या अंधारात बैठका घेता, काय चाललंय तुमचं?”

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व मान्य नसल्याची भूमिका घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. “नेतृत्व करण्याची जबाबदारी यांना दिली कुणी? कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? आम्हाला अजिबात मान्य नाही. आमचं कुणीही नेतृत्व नाही हे आम्ही पहिल्यापासून सांगितलं होतं. छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठका घेता, नेमकं चाललंय काय तुमचं?” असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी टीव्ही ९ शी बोलताना उपस्थित केला आहे.

“..तर पळता भुई थोडी करू”

“मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कुणीही नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातून तो सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. जवळचा एखादा माणूस हाताशी धरून आणि त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल अशी तुमची अवस्था केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha kranti morcha on sambhajiraje chhatrapati meeting with cm eknath shinde pmw