महाराष्ट्रातील २५ ऐतिहासिक किल्ल्याचे हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला आहे.  ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ने २५ किल्ल्यांची निवड केली असून सरकारच्या या निर्णयाचा मराठा क्रांती मोर्चाबरोबरच सह्याद्री प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र गड – किल्ले संवर्धन संघर्ष कृती समितीनेही विरोध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या पर्यटनची प्रचंड क्रेझ आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे या तिन्ही संघटनांने एक परिपत्रकाद्वारे म्हटले आहे.

‘महाराष्ट्रात सध्या ३५३ किल्ले असून जवळपास शंभर किल्ले या संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं जतन होण्याऐवजी त्यांचं हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी आहे. ज्या किल्यांवर मावळ्यांच्या रक्ताचे पाट वहिले त्याच किल्यांवर दारूचे पाट वाहतील. ज्या किल्यांवर तोफांचे धूर निघत होते त्याच किल्यांवर आता सिगरेटचे धूर निघताना दिसतील. हे आम्हा शिवभक्तांसाठी अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळेच या निर्णयाविरोधात आम्ही सर्व शिवप्रेमींनी एकत्र येऊन रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी मुंबईत एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्येच या विषयासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे, सरकारने घातलेला हा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलनाबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत,’ असं या तिन्ही संस्थांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील गड किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्सना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. या किल्ल्यांना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळाने तीन सप्टेंबर रोजी निर्णय घेतला होता. संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये नसलेले आणि सरकारी जमिनीवर नसलेले राज्याच्या मालकीचे किल्ले भाड्याने देण्यास हे नवीन धोरण एमटीडीसीला अनुमती देते. निवासी हॉटेल्सव्यतिरिक्त विवाहसोहळे आणि करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किल्ले रुपांतरित करण्याची योजना असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अलिकडच्या काळात राजवाडे आणि किल्ल्यांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याची पद्धत रुजत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha kranti morcha oppose the decision of mh gov to start heritage resorts on forts scsg