मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलना दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे एका तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. काकासाहेब शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. या मुद्द्यावरून आता ठिकठिकाणी वातावरण तापू लागले असून याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान मराठा समाजाच्या तरूणांनी पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुले मोठी वाहतूककोंडी झाली नाही.
याआधी, दिवसभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलने करण्यात आली. औरंगाबादमध्ये आंदोलन करताना काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे वातावरण काहीसे चिघळले. याचे परिणाम नवी मुंबईतही पाहायला मिळाले. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या काही मोर्चेकऱ्यांनी कामोठे हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने अडवत वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रमाणात वाहनांना अडथळा निर्माण झाला. पण पोलिसांनी त्वरित आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन हस्तक्षेप केला आणि वाहतूक सुरळीत केली.