रत्नागिरी जिल्ह्य़ातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी चिपळूण येथे आयोजित कोकणातील पहिल्या मूक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोकणची भौगोलिक परिस्थिती आणि पाऊस गेल्यामुळे जोरात सुरू झालेल्या भातकापणीच्या हंगामाच्या पाश्र्वभूमीवर हा प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर कोकणात प्रथमच संघटित झालेल्या या शक्तीच्या भावी वाटचालीबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
कोकणची आर्थिक-सामाजिक रचना बऱ्याच प्रमाणात परस्परावलंबी असल्यामुळे राज्याच्या अन्य भागांमध्ये काही वेळा उफाळून येणारा जात-धर्माचा कडवटपणा येथे सुदैवाने नाही. येथील मराठा समाजाला शिवाजी महाराजांच्या काळापासून देदीप्यमान ऐतिहासिक परंपरा आहे. स्वाभाविकपणे तो येथील पूर्वापार प्रस्थापित, प्रबळ आणि प्रभावशाली समाजघटक आहे. पण काळाच्या ओघात त्याचेही स्थर्य कमी झाले आहे. अस्सल कोकणी स्वभावानुसार हाही समाज कधी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात संघटित झाला नव्हता. या मोर्चाच्या निमित्ताने त्याच्या सामूहिक शक्तीचे प्रथमच दर्शन झाले आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, अन्य ठिकाणांप्रमाणेच येथेही त्यामध्ये युवक-युवतींचा कृतिशील सहभाग लक्षणीय राहिला. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्य़ातील मराठा समाजाच्या महाविद्यालयीन युवा वर्गाच्या खास बैठका घेण्यात आल्या. त्यातून सुमारे पाच हजार युवक-युवतींनी नावनोंदणी केली आणि त्यांनीच पुढाकार घेत मोर्चाच्या संयोजनातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यापैकी बहुसंख्यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. पण शिक्षण आणि नोकरीच्या मर्यादित संधींमुळे हा वर्ग गांजलेला आहे आणि या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आपल्या या असाहाय्य परिस्थितीत काही तरी बदल होईल, या एकमेव आशेने ही युवाशक्ती त्यामध्ये तन-मनाने सहभागी झाली.
अन्य ठिकाणच्या मोर्चाप्रमाणे येथेही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना संयोजनामध्ये जाणीवपूर्वक अंतरावर ठेवण्यात आले. पण मोर्चामध्ये सहभागी होण्यावाचून त्यांनाच गत्यंतर नव्हते. त्यानुसार जिल्ह्य़ातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मोर्चाला हजेरी लावली. एवढा मोठा समुदाय जमला असताना असे सक्तीने मागे राहावे लागण्याची त्यांची ही बहुधा पहिलीच वेळ होती. पण काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या समाजाबरोबर राहणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होती. राजकीय लाभ उठवणे हा या मोर्चाचा हेतू नाही, असे राज्याच्या विविध जिल्ह्य़ांमध्ये आजवर निघालेल्या मोर्चामधून आवर्जून सांगण्यात आले आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवाशक्तीला तर कदाचित त्याबाबत काहीसा तिटकाराच असावा, असे मानण्यासही जागा आहे. त्यामुळेच ही शक्ती जास्त स्फोटक ठरू शकते. कोकणच्या दृष्टीने हा नवीनच अनुभव आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणात अग्रभागी असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे धुरीण हे नवे वारे आपल्या शिडात भरून घेण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. सध्याचे वातावरण पाहता राष्ट्रवादीला त्याचा जास्त लाभ होण्याची शक्यताही आहे. पण या नव्याने आत्मभान येत असलेल्या पिढीला त्याचे आकर्षण नाही. त्यापेक्षा त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण आणि प्रत्यक्ष व्यवसाय किंवा नोकरीची जास्त गरज आहे. कोकणातील थोडेसे शिक्षण झालेला युवकही पोटासाठी लगेच मुंबईची वाट धरतो, ही येथील पिढय़ान्पिढय़ांची परंपरा आहे. त्यामध्ये काही गुणात्मक फरक आणण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. मोर्चाच्या संयोजन समितीचे प्रमुख सदस्य सतीश कदम यांनी येत्या काही दिवसांत त्याबाबत नियोजन सुरू होणार असल्याचे नमूद केले. तसे झाले तर कोकणातील या अभूतपूर्व मोर्चाचे भावी पिढीच्या दृष्टीने काही तरी चीज झाले, असे म्हणता येईल. अन्यथा कदम यांच्याच शब्दात सांगायचे तर हा ‘टाइमबॉम्ब’ फुटण्याचा धोका आहे आणि मग त्या परिस्थितीवर कोणाचेच नियंत्रण राहणार नाही.