सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी सादर केलेले पॅकेज म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा-मुस्लिम आरक्षणासंबंधी सरकार काय पावले उचलणार आहे, याबाबत शंका शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केली.
राज्यपालांच्या अभिभाषणास पाठिंबा देण्यास पृथ्वीराज चव्हाणांनी प्रारंभीच असमर्थता व्यक्त केली. याआधीच्या आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त व अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांत १३ हजार कोटी रुपयांची मदत केली. त्यांना पाणी दिले. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. त्यांना दिलासा दिला व त्यांचे स्थलांतर होऊ दिले नाही. आताचा दुष्काळ जास्त आहे, असे सांगितले जाते. सरकारने सर्व कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना रोख मदत केली पाहिजे. ही रोख रक्कम किती व केव्हा देणार हे सरकारने काहीच सांगितलेले नाही. विदर्भ व मराठवाडय़ाला झुकते माप दिले पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील शेतकऱ्यांनाही ठोस मदत दिली पाहिजे. मदत देताना भेदभाव का, अशी चिंता निर्माण झाली आहे, असे मत माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. विदर्भ-मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना ताकद देण्याची गरज असून त्यासाठी येथील सहकार चळवळ मजबूत करावी लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
सध्या स्वच्छता कार्यक्रमाचा गाजावाजा होतो आहे. छायाचित्रे काढून घेतली जात आहेत. कचरा इकडून उचलून तिकडे फेकला जात आहे. पण घनकचरा व्यवस्थापनाचा राज्यपालांच्या अभिभाषणात साधा उल्लेख नाही. मराठा-मुस्लिम आरक्षणासंबंधी सरकार काय पावले उचलणार आहे, याबाबत शंकाच आहे. आघाडी सरकारने कर्ज काढल्याने त्याचा राज्यावर भार पडला असून आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचा नन्नाचा पाढा सरकार वाचत आहे. त्यातच विकासकामांना कात्री लावावी लागणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. जुन्या सरकारच्या योजनांना खिळ घालण्याचा हा प्रयत्न आहे. महिलांवरील अत्याचार वाढले असून समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. नथुरामचा वाढदिवस सादरा केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली असून पोलीस दलात बेशिस्त व बेदिली माजली असल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र, राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात यंदा मतांचा टक्का वाढल्याचा व जनतेची सकारात्मकता वाढली असल्याचा उल्लेख केला. हे सरकार सकारात्मक, स्वच्छ, पारदर्शी व निर्णयाभिमुख राहील, अशी ग्वाही भाजपचे आशिष शेलार यांनी दिली. राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना विरोधी बाकावरील सदस्य ‘चले जाव’ घोषणा देत होते. जुन्या, चुकीच्या गोष्टींना हे सरकार ‘चले जाव म्हणत’ काम करणार असल्याचे शेलार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा