मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली जाणार असून, कोल्हापुरातून आंदोलनाला सुरूवात झाली. आज (२१ जून) नाशिकमध्ये मूक आंदोलन होत असून, आंदोलन सुरू होण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना महत्त्वाचं आवाहन केलं.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली असून, राज्यभरात मूक आंदोलनं केली जात आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी पहिलं मूक आंदोलन झाल्यानंतर आज दुसरं मूक आंदोलन नाशिकमध्ये सुरू झालं आहे. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

हेही वाचा-मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका

संभाजीराजे भोसले म्हणाले, “समन्वयकांना आणि जे राज्यातून आलेले आहेत. जे समाजाचे घटक आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. मी इतकंच सांगेन की, आपण जे आंदोलन पुकारलं आहे, ते मूक आंदोलन आहे. समाज बोलला आहे. आम्ही बोललो आहोत. आता लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त करावं. ते काय जबाबदारी घेणार, हे सांगावं. समन्वयकांनी आणि इतरांनी उलट प्रश्न करू नये. पक्षाशी संबंधित न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावं. कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही,” अशी भूमिका यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.

हेही वाचा- सकल मराठा समाजाचा मात्र आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक… आंदोलन सुरूच राहणार

आरक्षण व अन्य मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने राज्यभर मूक आंदोलन सुरू के ले आहे. यातील पाहिले आंदोलन बुधवारी कोल्हापुरात पार पडले. या आंदोलनास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाची दखल घेत सरकारने आंदोलकांना चर्चेसाठी पाचारण केले होते. यावेळी संभाजीराजेंनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असून लवकरच या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखालील समिती या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी समन्वयाचे काम करील. एवढेच नव्हे तर आपण स्वत: हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी बैठका घेऊ, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती सकल मराठा समाजास केली होती. मात्र, आंदोलन सुरू राहणार असल्याचं संभाजीराजे यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं होतं.

 

Story img Loader