वाई: मनोज जरांगे पाटील यांच्या साताऱ्यातील शिवतीर्थ येथे शनिवारी (दि. १८) होत असलेल्या सभेस मराठा समाजातूनच विरोध सुरू झाला आहे. मराठा समाजातीलच आंदोलकांनी आज येथे माध्यमांशी बोलताना जरांगे यांच्या ‘मराठा जातीचे सरसकट कुणबीकरण’ या मागणीस विरोध केला असून त्यांची उद्या येथे पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर होणाऱ्या सभेचे ठिकाणही बदलण्यास भाग पाडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साताऱ्यातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा परिसर म्हणजेच शिवतीर्थ येथे जरांगे यांची शनिवारी (दि. १८) सभा होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु या ठिकाणी जरांगेंनी सभा घेऊ नये अन्यत्र सभा घ्यावी, अशी मागणी मराठा समाजातूनच आता पुढे आली आहे. येथे सभा घेतल्यास त्यांना विरोध केला जाईल, असा इशारा मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण यांनी जरांगे पाटलांना दिला आहे. यातून समाजांतर्गतच वाद निर्माण झाल्याने या सभेचे ठिकाण आता बदलण्यात येऊन ती आता शहरातील गांधी मैदान येथे होणार आहे.

हेही वाचा >>> कार्तिकी यात्रेसाठी आजपासून पंढरीच्या विठुरायाचे २४ तास दर्शन; व्हीआयपी,ऑनलाईन दर्शन सेवा बंद

दरम्यान जरांगे यांना विरोध करताना तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या, की जरांगे पाटील मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला लागले आहेत. मराठा हा कुणबी नाही. मराठा समाजाला तुम्ही भडकावत आहात. मराठा समाज शेतकरी आहे असे बोलता; परंतु शेतकरी हे सर्व जातीत आहेत. कुणबी ही ओळखदेखील सर्व जातींमध्ये आहे. या आंदोलनामुळे विनाकारण मराठा समाजाची ‘मराठा’ ही ओळख पुसण्याचा डाव जरांगेंच्या आडून आखला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

जरांगे यांच्या मागण्या च आमच्या समाजाच्या विरोधात असल्याने त्यांनी शहरातील शिवतीर्थ परिसरात सभा घेत समाजाचा अपमान करू नये. आमची मराठा ही ओळख पुसण्याचा जरांगे यांना कुठलाही आधिकार नाही. त्यामुळे त्यांनी येथे सभा घेण्याचा तसेच ‘मराठा जातीचे सरसकट कुणबीकरण’ ही मागणी रेटण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज त्यांना विरोध करेल.

हेही वाचा >>> मी सध्या कुठंच नाही..पण सगळीकडंच आहे..; शरद पवारांचे सूचक विधान

पश्चिम महाराष्ट्रात पाच टक्केदेखील कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत.असे असताना मग उर्वरित समाजाला कुठले आरक्षण मिळणार? जरांगे यांच्या नादी लागल्यास हा मोठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. दुसरे त्यांच्या या मागणीमुळे विनाकारण ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण झाली आहे. आम्हाला आमचे आरक्षण मराठा म्हणून द्या. ते कायद्याने आणि टिकणारे द्या. यातून आम्हाला आरक्षण देखील मिळेल आणि आमची मराठा ही ओळखही कुणी पुसू शकणार नाही. जरांगे यांनी विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास मराठा समाज त्यांना माफ करणार नाही असा इशाराही तेजस्विनी चव्हाण यांनी दिला. दरम्यान, जरांगे यांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवत चव्हाण म्हणाल्या, की जो माणूस आजपर्यंत गेल्या दोन महिन्यांत सात वेळा विधाने बदलतो, तो समाजाच्या लढ्यासाठी योग्य नाही. जरांगे यांनी कुणबी म्हणजे मराठा असा घोळ करून समाजाची दिशाभूल केली आहे. त्यांना आमचा विरोध असून, त्यांनी पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सभा घेत सरसकट कुणबीकरणाचा मुद्दा मांडल्यास आम्ही त्यास विरोध करू, असा इशाराही चव्हाण यांनी या वेळी दिला आहे.त्यामुळे जरांगेची सभा आता गांधी मैदानावर होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha protesters against jarange patil rally in satara zws