मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी दोन दिवसात मराठा नेत्यांची बैठक घेणार असल्याचे भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांना सांगितले. मराठा आरक्षणावर दोन दिवसात मराठा नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणावर कोणीही राजकारण करू नका असेही त्यांनी म्हटले आहे. खासदार उदयनराजे यांनी, पहिल्यापासून मराठा आरक्षणासाठी मी पाठपुरावा केला. परंतु आता गळ्याशी आले आहे. या बैठकीच्या नियोजनासाठी शंभूराजे देसाई यांनी उदयनराजेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या विषयाचे कोणीही राजकारण करू नये व होऊ नये यासाठी त्यांनी श्वेत पत्रिका काढावी अशी मागणीही केली आहे.
८ मार्चपासून मराठा आरक्षणासंदर्भात नियमित सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा नेत्यांची दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण,शंभूराज देसाई यांच्यासह मराठा नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत असेही उदयनराजे यांनी सांगितले. याच विषयासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सातारा शहरातील पोवई नाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास उदयनराजे यांनी आज अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, माजी नगरसेवक प्रशांत अहिरराव, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सातारा शहरातील पोवई नाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकास अभिवादन केले व शुभ आशीर्वाद घेतले.#शिवजयंती pic.twitter.com/cKvqkMwLUh
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 19, 2021
सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणनिती आखण्याचे काम सुरु आहे. फलटणचे राजे रामराजे नाईक निंबाळकर, आमचे सातारचे राजे शिवेंद्रराजे, लोकशाहीतले राजे आखणी करत आहेत. बघू त्यांची आखणी काय आहे, मग ठरवू, असे म्हणत उदयनराजेंनी जिल्हा बँक निवडणुकीत आपली भूमिका काय असणार हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे. ८ मार्चपासून अधिवेशन होणार आहे. त्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. साताऱ्याला एक इतिहास असून, जिल्हा आदर्श होण्याच्या दृष्टीने राज्यपातळीवर शंभूराज व सगळे आमदार चर्चा करतील. परंतु, खासदाराच्या भूमिकेत केंद्रातील जे प्रश्न आहेत ते मांडू, अशी ग्वाही यावेळी उदयनराजेंनी दिली.