मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली होती. यासाठी अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. यासाठीचा मार्ग मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले, “२० जानेवारीला सकाळी ९ अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे.”
“आपण शांततेच्या मार्गानं मुंबईत जाणार आहोत. आरक्षण मिळवलं नाहीतर, मराठ्यांच्या मुलांचं प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे कुणीही घरी बसू नये. घरी राहिलो, तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल. ही शेवटची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय माघारी यायचं नाही,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.
“ट्रॅक्टरमध्ये काय साहित्य घ्यायचं? पाण्याची व्यवस्था कशी आहे? धान्य कसं घ्यायचं? याची सगळी माहिती पीडीएफद्वारे दिली जाईल. एक आचारसंहिता लागू करण्यात येईल. त्याच्या पुढं कुणीही जायचं नाही. फोटो काढण्यासाठी कुणीही गर्दी करायची नाही,” असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं आहे.
अंतरवाली ते मुंबई मार्ग कसा असेल?
जालना जिल्हा
अंतरवाली सराटी येथून सुरूवात
बीड जिल्हा
शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी
अहमदनगर जिल्हा
पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव
पुणे जिल्हा
सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा
मुंबई
पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान