मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मात्र मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकावर शंका व्यक्त केली आहे. १०० ते १५० जणांसाठी हे आरक्षण आहे. आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी समाजातील आरक्षण हवे आहे. आम्ही उद्या आमच्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत. आमच्या आंदोलनाच्या उद्या दिशा ठरवण्यात येणार आहे, असे जरांगे यांनी सांगितले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही उद्या आंदोलनाची घोषणा करणार”

“याआधी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे स्वागत केले होते. आताही १०० ते १५० जणांसाठी लागू होत असलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागतच करत आहोत. पण कोट्यवधी मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी प्रवर्गातील आरक्षण आम्हाला हवे आहे. मराठा समाजात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या बांधवांसाठी सगेसोयऱ्यांबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. आम्हाला जे हवंय ते आम्ही मिळवणारच. आम्ही उद्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत,” असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

“ते आरक्षण १०० ते १५० जणांसाठी लागू होणारे”

“मी सांगितले होते की सध्या लागू करण्यात आलेल्या आरक्षणाला नाकारण्याचे काही कारणच नाही. पण ते टिकेल का? याबाबत शंका आहे. सध्या लागू करण्यात आलेले आरक्षण हे राज्यापर्यंतच आहे. मात्र आम्ही जे हक्काचे आरक्षण मागत आहोत ते केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत लागू होते. त्याच आरक्षणातून मराठा समाजातील तरुण मोठे होणार आहेत. सरकारने लागू केलेल्या आरक्षणाची फक्त दोघा-तिघांची मागणी आहे. १०० ते १५० जणांसाठी लागू होणारे ते आरक्षण आहे. त्यात माझ्या मराठा तरुणांचे काहीही कल्याण होणार नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. हे आमच्या हक्काचे आरक्षण आहे. सगेसोयऱ्यांचा जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यावर आम्ही ठाम आहोत,” अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation bill passed in assembly manoj jarange demands obc reservation prd