राज्यात २८ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज अनेक दशकांपासून पिढ्यान् पिढ्या मागासलेला राहिला. हा वर्ग इतका दुर्बल आणि वंचित आहे की त्याला विद्यमान मागासवर्गीयांपासून स्वतंत्र आरक्षण देणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष नोंदवत आणि हीच अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती असल्याचे नमूद करून राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस केली ही शिफारस स्वीकारून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले. विधिमंडळात विशेष अधिवेशनात मंगळवारी हा कायदा कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगेसोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांनी आंदोलनची पुढची भूमिका आज स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २३ फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानुसार, सरकारने सगसोयऱ्यांसदर्भात कायदा केला नाही तर २४ फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. २४ फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात, शहरात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे. या काळात प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको करायचा आहे, असं आवाहन मनोज जरांगेंनी आज मराठा बांधवांना केलं. ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन करता येणार नाही, त्यांनी सायंकाळी चार ते रात्री ७ वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच, या काळात शांततेत आंदोलन करायचे आहे. जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >> “घातपातासाठी पाठवलेला कार्यकर्ता…”, नाव न घेता मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप; म्हणाले, “मी त्याला…”

२४ तारखेपासूनच आंदोलन का?

“२२ आणि २३ ला आंदोलनाचं निवेदन द्या. हे निवेदन कायम स्वरुपाचं आहे. आपल्याला असं आंदोलन सुरू करायचं आहे की आपण आपलं गाव सांभाळायचं. कोणीही तालुक्याला किंवा जिल्ह्याला यायचं नाही. आपल्या गोर गरीब मराठ्याचा पैसा वाचेल. पूर्ण गाव आंदोलनात उभं राहिल्याने शक्ती वाढेल. गावात असल्याने घराला कुलूप लावून आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि मागेही जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन यांना जेरीस आणण्यासाठी करायचं आहे. माझा किंवा कोणाचाही हट्ट पूर्ण करण्यासाठी आंदोलन करायचं नाही. महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपल्या गावात आंदोलन करायचं आहे. प्रत्येकाने रास्ता रोको करायचा आहे. हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. जाळपोळ वगैरे काही नाही”, असं जरांगे पाटील म्हणाले.

३ तारखेला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको होणार

दरम्यान, २४ तारखेपासून आपल्या गावात-शहरांत रास्ता रोको केल्यानंतर ३ मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यांत, एकाच ठिकाणी एकाच वेळी (दुपारी १२ ते १) मोठा रास्ता रोको करायचा आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या सभा, रॅली आणि आंदोलने झाली. पण एवढा मोठा रास्ता रोको झाला नसेल, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation from february 24 stop the road across the state and on march 3 jarangi told the next direction of the movement sgk