मराठा समाजाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. संभाजी राजे व मराठा समन्वयक अशोक चव्हाण यांनी काल तसे स्पष्टीकरण केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय केंद्र शासनाने सोडवला पाहिजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. मुश्रीफ कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या मराठा आंदोलनाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुश्रीफ यांनी घटना दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. “मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र शासनाने घटनेत दुरुस्ती केली पाहिजे असे मी मूक आंदोलनावेळी म्हणालो होतो. प्रकाश आंबेडकर यांनीही केंद्र शासनाने हा विषय सोडवला पाहिजे असे म्हटले आहे. काल राज्य शासनाशी संभाजीराजे यांनी चर्चा केली आहे. त्यानंतर ते व अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या मागण्या मार्गी लागत असल्याचे सांगितले आहे. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सारथीचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक होत आहे. यामुळे संभाजीराजेंनी राज्य शासनाकडे केलेल्या आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व मागण्या मार्गी लागत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र शासनाने सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी केला.
नक्की वाचा >> “वाझे, शर्मांना अटक झाली असली तरी या दोघांमागे असणाऱ्या मास्टर माईंडला वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न”
राम मंदिरासंदर्भात भाजपा, आरएसएसने खुलासा करावा
अयोध्येमधील राम मंदिराची उभारणी हा जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे त्यासाठी लोकांनी यथाशक्ती निधी साहित्य त्याचा पुरवठा केला आहे. राम जन्मभूमी जमीन घोटाळा प्रकरणी लोकांच्या मनात संशय बळावला असल्याने भाजप, राष्ट्रीय सेवक संघ व केंद्र सरकारने यांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी मुश्रीफ यांनी केलीय.
राम मंदिर व माझा निकटचा संबंध आहे. कागल येथे अयोध्याच्या आधी राम मंदिर उभे केले आहे. माझा जन्मही रामनवमीचा आहे, असा उल्लेखही यावेळी हसन मुश्रीफ यांनी आवर्जून केला. राम मंदिर उभारणीसाठी देशातील जनतेने यथाशक्ती मदत केली आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला काळे फासणे वा शिवसेना भवनावर चाल करून जाणे हे शोभाणारं नाही. दोन्ही शंकराचार्यांनीही या विषयी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात किंतु निर्माण होण्यापूर्वी याचे स्पष्टीकरण होण्याची गरज असल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत. अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर १५ जून रोजी हल्ला करण्यात आला होता.