राज्यातील आघाडी सरकारने मराठय़ांना आरक्षण देण्याच्या विषयावर केवळ नाटक केले असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आत आरक्षणाविषयी निर्णय घेण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी येथील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित छावा संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. तर, खा. रामदास आठवले यांनी या मुद्दय़ावर सर्व मराठय़ांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. शैक्षणिक आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील उपेक्षितांना मिळालाच पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठय़ांना आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी भूमिका या वेळी खडसे यांनी मांडली. आघाडी सरकारने या विषयावर मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. या सरकारने आरक्षण न दिल्यास चार महिन्यांनंतर सत्तेवर येणारे भाजप सरकार मराठय़ांना आरक्षण नक्कीच मिळवून देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. महायुतीतील घटक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते खा. रामदास आठवले यांनी दलितांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठय़ांना आरक्षण द्यावे या मागणीस आपला पाठिंबा असून ही मागणी पूर्ण होण्याकरिता आम्ही खांद्याला खांदा लावून लढू, असा निर्धार व्यक्त केला. दलित एकत्र येत नसले तरी मराठय़ांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर एकत्र येण्याची गरज मांडली. खडसे आणि आठवले दोघांनी राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर टीकास्त्र सोडले. या वेळी खा. प्रतापदादा सोनवणे, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, अधिवेशनाचे संयोजक विलास पांगारकर आदी उपस्थित होते.

Story img Loader