मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात चांगलंच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं उपोषण आंदोलन. सरकारने अध्यादेश दाखवल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारकडून मनधरणी केली जाते आहे. अशात मनोज जरांगे पाटील हे संघर्ष करत आहेत. याच मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता चित्रपट येणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका कोण साकारणार? याबद्दल आता मनोज जरांगेंनी स्वतःच उत्तर दिलं आहे.
तुमच्यावर सिनेमा येणार आहे हे विचारताच काय म्हणाले मनोज जरांगे?
“आयला, नवा ताप आला तो एक. आधीच मी उत्तरं देऊन बेजार झालो आहे. काही लोक मला भेटायला, मला वाटलं मला पाठिंबा द्यायला आले. त्यांनी चित्रपटाबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यांना जे काही माझ्याबाबत वाटतं आहे त्या भावनेतून ते चित्रपट तयार करत आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा. मला म्हणाले तुम्ही चित्रपटात काम करा, पण मला कसं जमेल ते?” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
२९ ऑगस्टपासून उपोषण सुरु आहे
मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात हे उपोषण सुरु आहे. सध्या सोशल मीडियावरही मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच त्यांच्याविषयीची माहिती, त्यांनी आत्तापर्यंत केलेली आंदोलनं याविषयीही सोशल मीडियावर लोक सर्च करत आहेत. मनोज जरांगे यांना आंदोलनामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारमधलेही मंत्री त्यांच्या भेटीला येऊन गेले आहेत. आजच अर्जुन खोतकर यांनी त्यांची पुन्हा एकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांच्या बरोबर एक सेल्फी काढण्यासाठीही तरूण गर्दी करत आहेत.
आता मनोज जरांगे यांच्यावर सिनेमा येणार आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका कोण करणार? तो सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.