Maratha Reservation: लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान ठेवतो, त्यामुळे मी सही केली. त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता असं आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सांगत फसवून सही घेण्यात आली. या सहीचा दुरुपयोग कुणी केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. आज सकाळी त्यांनी झेंडावंदनही केलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही काही वेळात सरकारच्या शिष्ट मंडळांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. शुक्रवारी सकाळपासून मराठा आंदोलक आझाद मैदानात पोहचू लागले आहेत. मराठा मोर्चा मुंबईतली आझाद मैदानात दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणांवरुन मराठा बांधव आझाद मैदानात यायला सुरुवात झाली आहे.

नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील आणि लाखो मोर्चेकरी दाखल झाले आहे. त्यांच्यासाठी तीन हजार किलोंचा मसालेभात तयार करण्यात आल्या आहे. २५ हजार पोळ्या घराघरातून जमा करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या अवाहनानंतर मोठ्या संख्येने पोळ्या जमा झाल्या आहेत. फक्त भाकरी आणि पोळ्या नाही तर ठेचा भाकरीही अनेकांनी दिल्या आहेत.

मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांना आराम करण्याची गरज असल्याचं बोललं जातंय. मागील काही दिवस पायी दिंडी मुळे जरांगे यांना झोप मिळत नव्हती. मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये निवासासाठी आहेत. तेथील सभेनंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यमध्ये चर्चा होणार आहे.