जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो मराठा समाजबांधव उपोषणाला बसले होते. मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने हे आंदोलन सुरू होतं. परंतु, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे जालन्यातलं वातावरण तापलं आहे. यावरून आता विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रूधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडीओंमधून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या लाठीहल्ल्याचा निषेध करत सरकारला जाब विचारला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये आव्हाड यांनी म्हटलं आहे, “एक आदेश येतो आणि या मराठा बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात.” आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे-पाटील आणि शेकडो मराठा बांधव उपोषणाला बसले होते. परंतु, आज (१ सप्टेंबर) सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही केला. दगडफेक सुरू झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या लाठीचार्जनंतर जालन्यात संतप्त जमावाने बसेसची जाळपोळ केली आहे. यामुळे जालन्यात सध्या तणावाचं वातावरण आहे.

या घटनेवर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी म्हटलं आहे की अंतरवली (जिल्हा – जालना) येथे मराठा आरक्षणासाठी स्थानिक मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता. यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. परंतु, एक आदेश येतो आणि या बांधवांवर पोलीस अमानुष लाठीहल्ला करतात. याची तीव्रता इतकी असते की अनेक सामान्य नागरिक अक्षरशः रक्तबंबाळ होतात.

हे ही वाचा >> इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…

आव्हाड यांनी म्हटलं आहे, राज्यातील एखादा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडत असताना, त्यांच्यावर असा अमानुष लाठीचार्ज करणं हे सरकारला शोभत नाही. केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार असतानाही मराठा बांधवांना आरक्षण देण्याची हमी देण्याचं सौजन्यसुद्धा हे सरकार दाखवत नाही. उलट त्यांच्यावरच लाठीचार्ज करून या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध.

Story img Loader