Jalna Lathi Charge on Maratha Protesters : जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. दरम्यान, राज्यातल्या अनेक नेत्यांनी आज सकाळपासूनच उपोषणाला बसलेल्या आंदोलकांच्या भेटी घेणं सुरू केलं आहे. तसेच ज्या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्या अंतरवाली सराटी गावाला सकाळपासूनच अनेक नेत्यांनी भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही काही वेळापूर्वी आंदोलकांची, ज्यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू होतं त्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं.
शरद पवार म्हणाले, शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं, परंतु, मध्येच अशा प्रकारे बळाचा वापर केला गेला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतंय. तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं, पोलिसांनी लाठीहल्ल्याच्या वेळी लहान मुलं पाहिली नाहीत, स्त्रिया पाहिल्या नाहीत, वडिलधारे लोक पाहिले नाहीत, प्रत्येकावर लाठीहल्ला केला. त्यांनी हवा तसा बळाचा वापर केला. आम्ही रुग्णालयात जखमी आंदोलकांशी बोललो तेव्हा जवळपास प्रत्येकाने हेच सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर जवळपास सर्वांनी असं सांगितलं की आमची चर्चा सुरू होती. अधिकारी आमच्याशी बोलत होते. या चर्चेतून मार्ग निघेल असं चित्र दिसत होतं. परंतु, अचानक मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तिथे बोलावण्यात आला. जखमी आंदोलक सांगत होते, सगळं व्यवस्थित सुरू असताना कुठून तरी, मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलिसांचं वागणं बदललं, त्यांचा उपोषणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि त्यांनी तिथे बळाचा वापर करून सरळ सरळ लाठीहल्ला सुरू केला.
हे ही वाचा >> Chandrayaan 3 : ‘प्रज्ञान’चं चंद्रावर ‘शतक’, ‘विक्रम’कडून देखरेख, इस्रोने दिली चांद्रमोहिमेची नवी माहिती
शरद पवार म्हणाले, पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केल्यावर सहाजिकच गावातील लोक तिथे जमा झाले. मोठ्या संख्येने लोक जमल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच छर्ऱ्यांचा मारा सुरू केला. शरिरात घुसलेले हे छर्रे शस्त्रक्रिया करून काढावे लागले. लोकांच्या अंगावर त्याच्या खुना आहेत. लोकांनी आम्हाला त्यांच्या अंगावरच्या जखमा दाखवल्या. पोलिसांनी या निश्पाप नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली.