मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून मराठा आक्रोश मोर्चाचं जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाला शेकडो लोक जमले होते. दरम्यान, सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी शेकडो मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला, तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या लाठीचार्जनंतर जालन्यात एकच एक गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आंदोलक आता रस्त्यावर उतरले आहेत.
पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन बस पेटवल्या आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. तसेच काही वेळापूर्वी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाल्याचं सांगितलं जत आहे. जिथे पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला तिथून चार किलोमीटर अंतरावर आंदोलकांनी दोन बस पेटवल्या आहेत. तसेच काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. एक खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाची एक बस आंदोलकांनी पेटवली आहे.
दरम्यान, टीव्ही ९ मराठीने काही स्थानिकांशी बातचीत केली. त्यावेळी एका ग्रामस्थाने सांगितलं की आंदोलक घोषणाबाजी करत होते, सरकारच्या लोकांनी त्यांच्या काही आंदोलकांना पकडून नेलं आहे, असं म्हणत होते. या आंदोलकांनी आधी बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं आणि मग बस पेटवल्या. तोंडाला रुमाल बांधलेले आंदोलक घटनास्थळी दिसत होते.
हे ही वाचा >> इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…
दरम्यान, “मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणारं सरकार आम्हाला नको”, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. यावर भाजपा नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अशी घटना झाली की त्यांचं खातेवाटप सुरू होतं. त्यांच्याकडं फार गंभीरतेने पाहू नये. सरकार थोडीच लाठीचार्जचे आदेश देते.”