राज्यातील विविध प्रश्नांबरोबरच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. तसेच मराठा आरक्षण केंद्राच्या अधिकारात येत असा दावाही केला आहे. त्यामुळे सध्या भाजपा आणि राज्यातील ठाकरे सरकार यांच्यात शाब्दिक चकमकी झडताना दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. दानवे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे आपण शिकवणी लावायलाही तयार आहोत, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून, यानिमित्ताने दिल्लीत असलेल्या शिवसेना खासदारांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. याबैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीविषयी बोलताना राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही आठड्यांपूर्वी दिल्लीत येऊन गेले. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचं निवेदन दिलं होतं. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक प्रश्नही आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाशीचा प्रश्न आहे. मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विम्याचा प्रश्न आहे. यासर्व प्रश्नांसंदर्भात त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली”, असं राऊत म्हणाले.
रावसाहेब दानवेंना दिलं उत्तर
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे’, असं दानवे म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही त्यांची शिकवणी लावू… त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे”, असं सांगत राऊतांनी दानवेंना उत्तर दिलं.
“अशोक चव्हाण सकाळी (२१ जुलै) माझ्याकडे आले होते. ते मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे काही कायदेशीरबाबी मांडल्या. आम्ही चर्चा केली. त्यामुळे ही शिकवणी वगैरे, अभ्यास वगैरे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहित आहे. हिंमत असेल तर बोलू नका. तुमच्या दरबारात आम्ही आलो होतो प्रधानमंत्र्यांना भेटायला. मुख्यमंत्री स्वत: आले होते. अजित पवार, अशोक चव्हाण सोबत होते. अभ्यास कुणाला शिकवताय. तुम्ही आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा. नाही तर आम्हाला पण शिकवता येतं, असा अशा शब्दात राऊत यांनी दानवेंच्या टीकेचा समाचार घेतला.