मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने सोलापुरात प्रचंड मोर्चा काढला. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ‘बंद’ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील जवळपास सर्व बाजारपेठा बंद आहेत. येथे काही ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे, आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीची काच फुटली. तर शिवाजी चौकात पोलिसांनी कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर बंद पुकारण्यासाठी पांजरापोळ चौकात मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र आला होता. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तर पार्क चौकात पोलिसांच्या वाहनावर तसेच अग्निशामक दलाच्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांना कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापूर बंदमध्ये सार्वजनिक वाहतुकीसह शाळा-महाविद्यालये, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीतील दैनंदिन व्यवहार बंद आहेत. मराठा समाजाच्या या बंदला चेंबर ऑफ कॉमर्स , सराफ असोसिएश, कम्युनिस्ट पार्टी,प्रहार संघटना आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

गेल्या आठवड्यात सोलापूरमध्ये आंदोलकांनी १६ बसेस फोडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation solapur bandh marartha morcha