कराड : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले आणि इतर मागास प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसह मराठा आरक्षणप्रश्नी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ आज सोमवारी (दि. ३०) सकल मराठा समाजातर्फे कराड शहरातून भव्य मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना करण्यात आल्या. येथील दत्त चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून, मराठा समाजातील आबाल वृद्धांच्या सहभागात मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या या विराट मोर्च्याने अतिशय उत्तम शिस्त आणि ताकदही दाखवून दिली. मोर्चेकऱ्यांचे स्वयंस्फुर्तीने जल अन् अन्नत्याग आंदोलनही छेडले होते.
हेही वाचा >>> बीडमध्ये उद्रेक, आंदोलकांकडून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
मोर्चाच्या प्रारंभी अश्वारूढ भागवाधारी मावळा, त्यापाठोपाठ भगव्या टोप्या परिधान केलेल्या पारंपारिक पेहराव्यातील महिला व युवती त्यानंतर समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चातील अनेकांच्या हातात आपल्या मागण्यांचे फलक झळकत होते तर, ‘मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो, हम तुमारे साथ है’, ‘आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या बापच’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच तहसीलदार विजय पवार यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
त्या तिघांमुळे चिंता अन् तणाव दरम्यान, मोर्चातील तीन तरुण दत्त चौकातील मनोज जरांगे-पाटील यांच्या भव्य फलकाच्या लोखंडी चौकटीच्या टोकावर चढले. जमिनीपासून या फलकाचे टोक जवळपास ७० फुटांवर असल्याने आणि या तीन युवकांचा तिथे चढून उभे राहण्याचा हेतू स्पष्ट नसल्याने चिंता अन् तणाव निर्माण झाला. यावर ध्वनिक्षेपकावरून या तिघांना खाली उतरण्याचे आवाहन मराठा समाज समन्वयकांनी वारंवार केले. पोलीस अधिकारीही तातडीने दाखल झाले. आणि अखेर काही वेळानंतर हे तीन तरुण फलकाच्या मनोऱ्यावरून खाली उतरले.