मराठा समजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी या अगोदरच शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना आंदोलनाची तलवार उपसलेली असताना, आता पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे.
“#मराठा_क्रांती_मुक_आंदोलन… वादळापूर्वीची ही शांतता. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा!” असं ट्विट करत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिला आहे.
वादळा पुर्वीची ही शांतता.
समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा ! pic.twitter.com/67iRh7pUbe
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2021
आरक्षण प्रश्नी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात आंदोलन करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केलेली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
उदयनराजे-संभाजीराजेंची पुण्यातील भेट रद्द; उदयनराजेंनी सांगितलं कारण
दरम्यान, उदयनराजे आणि संभाजीराजे यांची भेट होणार होती. मात्र, ही भेट रद्द झाली आहे. ‘माझी काही नियोजित ठरलेली कामे असल्याने मला त्यांना भेटता येणार नाही. या गोष्टीचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये. येत्या दोन-चार दिवसांत आमची भेट होईल. या भेटीनंतर आम्ही आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ,” असं उदयनराजेंनी सातारा येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.